मान्सूनपूर्व करावयाचा कामांचा महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी आढावा घेऊन शहरातील नालेसफाई, स्वच्छता आणि रस्ते दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाली तर सर्वांनी एकत्रितपणे आणि सतर्कतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी २४ तास मोबाईल चालू ठेवावेत, अशी सूचना देत कामाच्या वेळेत मोबाईल बंद असल्याचे आढळून आले तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी प्रभाग समितीनिहाय १ जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये शुक्रवारी आयुक्त डाॅ. शर्मा यांनी बैठक घेऊन त्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मनीष जोशी, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, शंकर पाटोळे, सर्व सहाय्यक आयुक्त तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सद्यस्थितीत सुरु असलेली रस्ते दुरूस्तीची कामे लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागामार्फत प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्याबरोबरच शहरातील नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरातील प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्यात राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करणे, असे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत, तिथे तात्काळ चेंबर्सची झाकणे बसविणे, रस्त्यावरील चर तसेच खड्डे बुजविणे. शहरात ज्या ठिकाणी पाणी पुरवठा, मलनि:सारण विभागाची कामे सुरू असतील, त्या ठिकाणी अपघात घडू नये यासाठी दक्षता घेणे, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. विजेचा धक्का लागून, चेंबर्स उघडी राहिल्याने किंवा पावसाळ्यात वाहून जाऊन जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहोचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रीत करुन ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या करोनाचा संसर्ग कमी आहे. परंतु पावसाळयात साथीच्या आजारांचा पादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहील याची विशेष काळजी घ्यावी. तसेच अग्निशमन विभागाने सतर्क राहवे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

करोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. करोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिका, प्राणवायू योग्य पुरवठा, प्राणवायू खाटा, आरटी-पीसीआर आणि शीघ्र प्रतिजन चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवणे अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरात लसीकरणासोबत आरटीपीसीआर आणि शीघ्र प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. करोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून महापालिकेच्या आरोग्य केंद्रात विविध वयोगटासाठी शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण मोहीम सुरु आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण अद्यापही पूर्ण झाले नाही, त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच सद्यस्थितीत करोनाचा संसर्ग कमी असला तरी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर, सामजिक अंतर आणि सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.