Thane News, dahi handi 2025 ठाणे – ठाणे शहरात सकाळ पासून ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक दाखल झाले आहेत. विविध दहीहंडी आयोजकांकडे या पथकांनी थर रचले. त्यातील काहीजणाचे थर अचूक लागले तर, काहींचे कोसळले. पण,या चुरशीमध्ये पाच ते सहा गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन गोविंदांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडींना लाखो रुपयांचे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या दहीहंडीमध्ये थर रचण्यासाठी सकाळपासून ठाण्यासह मुंबई आणि उपनगरातील गोविंदा पथक दाखल झाले आहेत.

सकाळ पासून हे गोविंदा उंच उंच थर रचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, काही ठिकाणी गोविंदा थर रचताना कोसळून जखमी झाले आहेत. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार,कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सद्यस्थितीला तीन गोविंदा उपचारासाठी दाखल झाले आहेत.

कळवा येथे राहणारा आदित्य रघुनाथ वर्मा ( १८) याच्या डोक्याला, मुंब्रा पारसिक नगर येथे राहणारा कृष्णा मिठू स्वयन (१३) याच्या उजव्या हाताला आणि कळवा अतकोनेश्वर नगर येथे राहणारा समर बन्सीलाल राजभर (१०) यांच्या डोक्याला दुखापत झाली असल्याची ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. तर, श्रीराज पवार (१०) हा गोविंदा गोपाळकालाच्या पूर्वसंध्येला थरावरुन खाली कोसळला होता. त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहन पागे आणि कल्पेश पाटील हे दोन गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे ते उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिली.