Dahi Handi 2025, Thane News ठाणे : गोपाळकालासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. तर, दुसरीकडे गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून पारितोषिकांची घोषणा केली जात आहे. मुंबईप्रमाणे ठाणे शहरातही मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडतो. या उत्सवात ठाणेसह मुंबईतील गोविंदा पथक देखील सहभागी होत असतात. यंदा ठाण्यातील मानाच्या हंडीसाठी लाखोंचे पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील टेंभीनाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सव सुरु केला. त्यांनी या साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तेव्हा पासून टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंदी ही मानाची हंडी मानली जाते. प्रत्येक गोविंदा पथकाची ही दहीहंडी फोडण्याची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथक या हंडीला सलामी का होईना देऊन जातात.
यंदाही तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी आणि सांगितिक कार्यक्रमासह भगव्याचा जल्लोष शनिवारी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार आहे. हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.
मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा आणि आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे.
हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीसे तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांकरीता आहे, असे आयोजकांनी सांगितले. हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा प्रमुख), टेंभीनाका मित्रमंडळाचे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, सर्व शिवसेना पदाधिकारी, टेंभी नाका मित्र मंडळाचे पदाधिकारी आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.
ठाणे आणि मुंबईच्या गोविंदासाठी वेगवेगळी हंडी
या दहीहंडी महोत्सवात मुंबई आणि ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी तसेच ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १० हजार, सहा थरांसाठी ७ हजार, पाच थरांसाठी ५ हजार तर, चार थरांसाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
नामवंत गायक आणि कलाकारांची उपस्थिती
या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य आणि संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.