ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो चार) मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडच्या जागेचा वाद सुरु आहे. शुक्रवारी सकाळी मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाने घेतला. ही जमीन आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात येत आहे. मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यास येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ तणावाचे वातावरण झाले होते.
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरु आहे. घोडबंदर येथील मोघरपाडा भागात मेट्रोच्या कारशेडची निर्मिती केली जाणार आहे. सुमारे ५० वर्षांपासून येथील शेतकऱ्यांचा या जमीनीवर उदरनिर्वाह येथील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा या मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यास विरोध आहे. शुक्रवारी येथील जमीनीचा ताबा मिळविण्यात येणार होता.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ३०० ते ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, एमएमआरडीएचे अधिकारी प्रस्तावित कारशेडच्या जागेवर दाखल झाले. त्यानंतर येथे फलक उभारण्यात आले. १६७ शेतकरी खातेदार आणि अतिक्रमित करण्यात आलेल्या १७४ हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भातील कारवाई अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर या जागेचा ताबा एमएमआरडीए कडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.