ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजिनक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या इमारती जुन्या झाल्या होत्या. यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. रुग्णालयाची सध्याची क्षमता ही ३०० खाटांची होती. अनेक आधुनिक उपचार येथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे त्यांना मुंबईला पाठवावे लागते. तातडीने उपचार मिळाल्यास असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेउन या रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी तयार केला होता. बुधवार १२ एप्रिल रोजी ८७ वर्ष जुने दगडी बांधकाम असलेली इमारत पाडण्यात आली. १९३६ साली नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती.

हेही वाचा >>>आंबिवली इराणी वस्तीत हाणामारी करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या ठिकाणी ९०० बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार असून यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. त्याचबरोबर नवीन होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. न्यूरॉलॉजी, ॲान्कोलाॅजी व ऑन्को सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार आहे.