पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम

ठाणे : ठाणे ते दिवा या रेल्वे मार्गिकेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रेतीबंदर भागात सुरू आहे. २१ मार्चला म्हणजेच, रविवारी या ठिकाणी लोखंडी तुळई बसविण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी २४ तास बंद ठेवला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी एमआरव्हीसीकडून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणाचा भाग म्हणून मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीकिनारी उन्नत मार्ग निर्माण करण्यात येत आहे. या उन्नत मार्गावर रविवारी तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उन्नत मार्गाखालून जाणारा मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. येथील वाहतूक पूर्व द्रुतगती मार्ग, ठाणे- बेलापूर, ऐरोली, दुर्गाडी भागातून वळविण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांचे ७०० कर्मचारी तैनात

या उन्नत मार्गिकेवर  ७ मार्चलाही एमआरव्हीसीने १५० कामगार आणि यंत्रणेच्या मदतीने यापूर्वीही  एक लोखंडी तुळई उभारली होती. त्याच ठिकाणी आता पुन्हा २१ मार्चला आणखी एक लोखंडी तुळई उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे सुमारे ७०० पोलीस कर्मचारी आणि ५०० वाहतूक समन्वयक शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर तैनात करण्यात येणार  आहेत.

वाहतूक बदल असे आहेत हलक्या वाहनांसाठी

नवी मुंबईहून मुंब्रा बाह्यवळणमार्गे ठाणे, घोडबंदर येथे येणारी वाहने महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाण्यात येतील. किंवा कल्याणफाटा, शिफळाटा येथे डावीकडे वळून महापे चौक, रबाळे, ऐरोली, विटावा, कळवा नाका मार्गे ठाणे शहरात येतील. तसेच भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने कल्याण फाटा, कल्याण रोड, पत्रीपूल, दुर्गाडी, कोनगाव, रांजनोली मार्गे जातील.

नाशिकहून तळोजा, पनवेल, नवी मुंबईत जाणारी वाहने पडघा नाक्याहून, येवईनाका, सावदनाका, बापगाव, आधारवाडी, पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी मार्गे, एमआयडीसी, तळोजा सिमेंट रोड येथून कळंबोली नवी मुंबईत जातील.

खारेगाव टोलनाका येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका येथून मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे जातील.

अवजड वाहनांसाठी

उरण जेएनपीटीहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कळंबोळी चौक येथून उजवीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसी, उसाटणे, खोणीफाटा, नेवाळीनाका, पत्रीपूल, दुर्गाडी चौकातून भिवंडी किंवा मुंबई-नाशिक महामार्गे नाशिकच्या दिशेने जातील.

जेएनपीटीहून घोडबंदर, ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने कळंबोळी चौक, न्हावडेफाटा येथून उजवीकडे वळण घेऊन कल्याणफाटा, शिळफाटा, येथून डावीकडे वळून, महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाणे घोडबंदरच्या दिशेने ये-जा करतील.

नाशिकहून मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा ब्रिज, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, आनंदनगर येथून नवी मुंबईत जातील. किंवा रांजनोली, कोनगाव, दुर्गाडी चौक, चक्कीनाका, नेवाळी, खोणी गाव मार्गे जातील.