ठाणे – दिवाळी सणात महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत परंपरेची जोपासना केली जाते. शिवाजी महाराजांची गडकिल्ले प्रामुख्याने साकारले जात असतात. पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दगड माती, शाडू माती, विटा, लाकूड, कागद, शेण अशा विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करत किल्ले साकारले जातात. यंदा विविध तांत्रिक गोष्टींचा वापर करून शिवरायांच्या लढाईतील चलचित्रांचा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये शाहिस्तेखानाची फजिती या क्षणांचे चलचित्रे साकारत ऐतिहासिक घटनेची माहिती देण्यात आली आहे. तसेच विविध दुर्ग साकारण्यात आले आहेत.

दिवाळी सण म्हटलं की किल्ले बांधणी करणे हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे. विविध गावांमध्ये अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची परंपरा कायम आहे. हीच परंपरा शहरी भागातही जोपासली जावी म्हणुन ठाणे शहरातील राज्याभिषेक समारोह संस्थेच्यावतीने दुर्ग बांधणी हा उपक्रम राबविला जातो. दरवर्षी या उपक्रमात ठाणे शहरासह इतर शहरातील स्पर्धक सहभागी होत असतात. यंदाही ठाणेसह मुंबई, कल्याण डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई, अकोला, अमरावती, बुलढाणासह थेट परदेशातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विविध दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये घाटकोपर येथील शिवकृपा चाळ नंबर एक आणि दहा यांनी शाहिस्तेखानाची फजितीचे चलचित्र देखावा साकारला आहे. यात शाहिस्तेखानाची बोट कशी छाटली, हल्ला कसा झाला हे चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

तसेच, जंजिरा, पद्मदुर्ग सारख्या जलदुर्ग देखिल बांधण्यात आले आहेत. रायगड, प्रतापगड, राजगड, माहुली भंडारगड, पळसगड, अजिंक्यतारा अशा विविध दुर्गांची उभारणी करण्यात आली आहे. खोपट येथील ओंकार मित्र मंडळ यांनी जंजिरा, पद्मदुर्ग, सामराजगड-शंभूसेतू, शिवकालीन नाव असे वैविध्य दुर्गामध्ये दाखवले आहेत. पारशेवाडी कोपरी येथील हनुमान मित्र मंडळाने राजगड साकारला आहे. चारकोप येथील मातोश्री गृहनिर्माण सोसायटी अजिंक्यतारा साकारला आहे. दरम्यान अचानकपणे आलेल्या पावसाने अनेक किल्ल्यांचे नुकसान झाले. अनेकांनी या दुर्गांची पुनर्बांधणी करत उपक्रमात सहभाग नोंदवला.

राज्याभिषेक समारोह संस्थेच्या या उपक्रमात युनेस्को मध्ये समाविष्ट केलेले १२ किल्ल्यांवर आधारित दुर्गपराक्रमांची प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. पारितोषिक वितरण सोहळा रविवार, ९ नोव्हेंबर होणार असून यावेळेस शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे ‘शिवप्रताप दिन ते राज्याभिषेक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

तसेच यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या सरदारांनी त्यांना साथ दिली, स्वराज्यासाठी महाराजांबरोबर लढाईत सहभागी होते, त्यामधील काही सरदारांचे वंशज पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये इंद्रजीत जेधे, अनिकेत राजे बांदल, रवि कंकं, बाळासाहेब सणस, गोरख करंजवणे यांची उपस्थिती असणार आहे.