ठाणे : दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी खरेदीसाठी ठाणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांत प्रचंड गर्दी उसळली होती. अनेकजण स्वतःच्या वाहनाने बाजारपेठेत आल्याने शहरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली. पाच मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जांभळी नाका, गावदेवी परिसर, राम मारुती रोडी, गोखले रोड याभागात वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे शहरातील राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर या शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. यापैकी जांभळी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते. याठिकाणी धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य उपलब्ध होते. तसेच या बाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्याने ग्राहक याठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

तसेच ठाणे स्थानक परिसरात काही विक्रेते पदपथावर साहित्य विक्रीसाठी बसले आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा इलेक्ट्राॅनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी अशा विविध साहित्यांनी फुलल्या आहेत. दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहे.

शहरात शहरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या अनेकांनी रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. परिणामी, पाच मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत होता.