ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसराचा रस्ता मीरा- भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावरील ठाणे ते घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. परंतु त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने घोडबंदर ते ठाणे या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. या मार्गावर खड्ड्यातुन प्रवास सुरु असल्याने आणि त्यामुळे कोंडी होत असल्याने नागरिकांकडून टीका होत होती. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या सल्ल्यानुसार रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून यामुळे खड्डेमुक्त प्रवासामुळे चालकांचा तूर्तास दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावरील फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट पर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित केला आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात घाट परिसरातील चढणीवरचे खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्केटच्या दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने त्यांना घोडबंदर वरून ठाण्याकडे येणार मार्गीकेचे काम करणे शक्य झाले नव्हते. या मार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच, मिरारोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होतो.

ठाणे महापालिकेचा सल्ला

या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी नुकत्याच झालेल्या दिली. त्यासंदर्भात, पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली होती. त्यानुसार, हे काँक्रिट कमीत कमी वेळात एकजीव होते. त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती करणे शक्य होते. नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्डेमुक्त प्रवासमुळे तूर्तास दिलासा

फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी, रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार, फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर रॅपीड हार्डनिंग काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. दोनच दिवसात हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे खड्डेमुक्त प्रवासामुळे चालकांचा तूर्तास दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.