Ganesh utsav 2025 : ठाणे : ठाणे शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, डीजे, लेझीम अशा विविध प्रकारच्या मिरवणुकांचे आयोजन केले आहे. काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका काढण्याचे नियोजनही केले आहे. परंतु शनिवारी सकाळपासूनही सतत आणि मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे, विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट पसरले आहे.

ठाणे महापालिकेकडून कृत्रिम तलाव, तसेच नैसर्गिक विसर्जन घाटांवर आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. साफसफाई, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, विसर्जनाच्या स्थळांवर सुरक्षा आणि नियंत्रण राखण्यासाठी पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन घाट परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात केले जाणार आहे. घाटावर प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. दिवसभर शहरात पावसाच्या सरी जोरदार कोसळत असल्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकांवरती पावसाचे सावट होते. असाच सतत पाऊस पडत राहिला तर गणपती विसर्जन मिरवणूक काढायच्या कशा प्रश्न मंडळांकडे पडला होता.

कृत्रिम तलावांची व्यवस्था

आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाई नगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर, आत्माराम पाटील चौक आदी २४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम आदी ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.

शहरात कडेकोट बंदोबस्त

अनंत चतुर्दशी निमित्ताने आज, शनिवारी ४४ हजाराहून अधिक सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांकडून सुमारे आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन घाट परिसर, विविध ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना शहरात मिरवणूका संपेपर्यंत बंदी लागू केली आहे.

विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट

ठाणे शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. शनिवारी सकाळपासूनही सतत आणि मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे, विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट पसरले आहे. शहरातील बहुतांश भागांत दुपारी मुसळधार सरी कोसळत होत्या, यामुळे अनेक मंडळांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर मिरवणुका काढणे कठीण होईल, अशी चिंता काही मंडळांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मिरवणूक नियोजन कोलमडण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. काही मंडळे डीजे वाद्यांच्या ऐवजी केवळ मूर्ती घेऊन थेट विसर्जन स्थळी जाण्याचा विचार करत आहेत, तर काही मंडळांनी वेळेत बदल करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.