ठाणे : राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) काही अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या निवृत्तीमुळे झालेल्या रिक्त पदावर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती केली आहे. पांचाळ हे यापूर्वी जालन्याचे जिल्हाधिकारी होते. ते आज, गुरुवार दुपारनंतर ते पदभार स्विकारणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३१ जुलै रोजी सेवानिवृत होत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील नवीन अधिकाऱ्याची नेमणुक केली आहे. या संबंधीचा आदेश राज्य शासनाने तसे आदेशाचे पत्र बुधवारी सांयकाळी काढले आहे. यात जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनेकांची नावे होती चर्चेत

राज्यातील सत्ताबदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागेवर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, सरकारने श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती केल्याने या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज स्विकारणार पदभार

अशोक शिनगारे यांच्या सेवानिवृत्तीमुळे ठाणे जिल्हाधिकारी हे पद रिक्त होत आहे. त्यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करत श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सरकारने आदेशात म्हटले आहे. तसेच जालना जिल्हाधिकारी पदावर अशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन पदाचा म्हणजेच ठाणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार शिनगारे यांच्याकडून गुरुवार, ३१ जुलै रोजी स्विकारावा, असेही सरकारने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे गुरूवार दुपारनंतर पांचाळ हे पदभार स्विकारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.