ठाणे – यंदा घोडबंदर येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्यावतीने पहिल्यांदाच गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या नजरेत या उत्सवाची चमक कमी आहे. कारण आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्ते यांनी त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांना या नवरात्रोत्सवामुळे वाहतूक समस्येत अधिक भर पडण्याची चिंता सतावत आहे. उत्सव जितका भव्य, तितकीच रस्त्यांची अवस्था आणि वाहतुकीची समस्या गंभीर होणार आहे. अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
नवरात्रोत्सवात ठाणे शहराचा प्रत्येक कोपरा उत्साहात न्हाऊन निघतो. देवीच्या आगमनापासूनच भक्तिमय वातावरण तयार होते. मंदिरांमध्ये आरास, आरती, भजन-कीर्तन, सार्वजनिक मंडपांमध्ये भव्य सजावट, ढोल-ताशांच्या गजर, विद्युत रोषणाईने संपूर्ण शहर उजळून निघते. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषा परिधान करत थिरकतात. नामांकित गायक, कलाकार आणि संगीतकार यांच्या उपस्थितीमुळे ठाण्याचा नवरात्रोत्सव राज्यात वेगळा ठरतो.
मात्र यंदा ठाण्यातील नवरात्रोत्सव आणि गरबा घोडबंदरवासीयाना आनंद देण्याऐवजी त्रासात भर घालणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग ग्रुप यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच घोडबंदर येथील एका मैदानावर गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, या उत्साहाबरोबरच एक मोठे आव्हान स्थानिकांसमोर उभे राहिले आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची बिकट अवस्था.
घोडबंदर रस्ता हा ठाणे-मुंबई जोडणारा मुख्य मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असतेच. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आधीच खड्डेमय रस्ता आणि दैनंदिन कोंडी यांमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांना या नवरात्रोत्सवामुळे वाहतूक समस्येत अधिक भर पडण्याची चिंता सतावत आहे.
महामार्गावर किरकोळ अपघात घडला तरी लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. आता इथेच भव्य लाईटिंग, मोठा मंडप, आकर्षक सजावट आणि नामांकित कलाकारांमुळे दररोज हजारोंची गर्दी जमणार आहे. आयोजकांच्या मते हा कार्यक्रम नवीन ठाण्याचा नवरात्र ब्रँड ठरणार आहे. मात्र स्थानिक कोंडीच्या सम्स्येने त्रस्त आहेत. याबाबत स्थानिक नागरिक समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
हा गरबा कोणत्या ठिकाणी ?
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग ग्रुप आयोजित जीएम नवरात्री महोत्सवाचे आयोजन नवीन ठाणे म्हणून ओळखले जाणाऱ्या घोडबंदर भागामध्ये असलेल्या बोरिवडे मैदानावर होणार आहे.
समाजमाध्यमांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया
- घोडबंदरवर आधीच एवढी वाहतूक कोंडी होत असते, त्यात आता नवरात्रात रोज दहा दिवसांची कोंडी वाढणार, असे एका स्थानिकाने सांगितले.
- दुसऱ्या रहिवासी म्हणाले, आमच्या मुख्य मागण्या म्हणजे रस्ते आणि पाणी, नाचगाणी नव्हेत. प्रथम या समस्या सोडवा.
- एका महिलेने आयोजकांना उद्देशून प्रतिक्रिया दिली की, खरंच, तुमचा हेतू खूप चांगला आहे. पण दादा, घोडबंदर रोडला आधीच प्रचंड वाहतूक कोेंडी असते. आता नवरात्रात किती गर्दी होईल, याची कल्पना करा. रस्त्यांची अवस्था आणि उत्सव बघता सर्वत्र भयानक परिस्थिती होणार आहे. मग दुरुस्ती आणि वाहतूक कोंडीच्या व्यवस्थापनाचे काय?