ठाणे : आजच्या बदलत्या, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांसमोर अनेक नवनवीन प्रश्न उभे राहत असतात. यामध्ये प्रेमसंबंधातील गैरसमज, करिअरबाबतची अनिश्चितता आणि पालकांशी नातेसंबंध टिकवण्याचे आव्हान यामुळे पिढी मधील दरी वाढताना दिसते. ही दरी कमी करण्यासाठी संवादाचे माध्यम वापरले जाणार आहे. ठाण्यात ‘वय- वादळ विजांच!’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आईचिर्लादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि रक्षक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आला असून पालक आणि युवकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
आजच्या पिढीतील अनेक युवक हे सोशल मीडियामध्ये रमूनगेले असून ते प्रत्यक्ष संवादापासून दुरावले गेले आहेत. या कारणामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव वाढत असून, गैरसमज निर्माण होऊ लागले आहेत. त्याचबरोबर करिअरच्या स्पर्धात्मक धावपळीत मानसिक ताणतणाव वाढू लागला आहे. अशा काळात युवकांना समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची गरज आहे. पालक आणि युवकांमध्ये संवाद असणे महत्वाचे आहे. याच युवक आणि पालकांच्या नात्यांमधील संवादाकरिता ठाण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात साहित्यिक आणि कवी प्रा. प्रवीण दवणे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांच्या प्रभावी विचारसरणीतून प्रेमसंबंधातील गुंतागुंती, करिअरचा दबाव आणि पिढीजात मतभेद यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तरुणाई आणि पालकांना संवादाच्या माध्यमातून नव्या दृष्टीकोनाची प्रेरणा मिळावी, असा आयोजकांचा विश्वास आहे.
कार्यक्रम कधी आणि कुठे ?
हा संवादात्मक कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता, विठ्ठल मंदिर, कोपरी गाव, ठाणे (पूर्व) येथे होणार आहे. युवकांनी आपले प्रश्न थेट मांडावेत आणि पालकांनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे आयोजन आईचिर्लादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि रक्षक प्रतिष्ठान यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात पद्मजा नितीन पाटील, रुपाली हेमंत पाटील, वैशाली स्वप्नील लांडगे आणि कुणाल मालंदे पाटील हे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचा उद्देश काय ?
‘प्रेम, करिअर आणि नातेसंबंध’ या जीवनातील महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर युवक-पालकांमध्ये मोकळा संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम असणार आहे. ठाण्यातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.