ठाणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे मंदीर ओळखले जाते. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध असून ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. या मंदिरात पाणी गळती होत आहे. त्यामुळे मंदीराचा गाभारा पाडण्यात येत आहे. त्यास विरोध होत असून त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आव्हाड म्हणाले, जातीव्यवस्थेला छेद देण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी एक मोठा समुदाय असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण दिले. इतर मागासवर्गीयांना जो अधिकार मिळतो, त्याचे जनक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. मंडल आयोगाला विरोध पहिल्यांदा भाजपने केला. पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आणि तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी निर्णय घेताना सर्वांशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. मंडल आयोग कोणी स्वीकारला असेल तो महाराष्ट्र राज्याने. काल सुप्रीम कोर्टाने मार्ग खुले केले आणि जातीय आरक्षणातून निवडणूक झाली पाहिजे, हे सांगितले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ते म्हणाता आमचा डिएनए ओबीसी

बहुजनांचे राज्य आले पाहिजे हे आमचे म्हणणे आहे. आमची संख्या ९० टक्के आणि आमचे प्रतिनिधित्व ९ टक्के कसे चालेल. जिसकी जितनी संख्या, उसकी उतनी जिम्मेदारी. इतर मागासवर्गीय हे ६५ टक्के आहेत. बहुजनांची संख्या बिहारमध्ये ८५ टक्के आहे. शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केले. ९ ऑगस्ट पासून नागपूर येथून मंडल यात्रा सुरू होईल, राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा असेल. याला हिरवा झेंडा स्वतः शरद पवार दाखविणार आहेत.

ओबीसी यांच्या आरक्षणाला विरोध केला, ते आता म्हणत आहेत, आमचा डिएनए ओबीसी आहे. गोस्वामी नावाच्या व्यक्तीने आग लावून घेतली होती, मंडल आयोगाच्या विरोधात हा कोण होता गोस्वामी? मंडल आयोगाचे जनक विश्वनाथ प्रताप सिंग हे होते. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आम्ही विधिमंडळात भाषण केली. लोकांमध्ये मंडल आयोगाबाबत जागृती व्हावी, आपल्या हक्क बद्दल जागृती व्हावी, आपल्यावर झालेला अन्याय विसरता कामा नये यासाठी ही जनजागरण यात्रा सुरू होणार आहे. वन नेशन वन इलेक्शन हे चुकीचे आहे. या सरकारमुळे तीन वर्ष वाया गेली. कोण न्यायालयात गेले हे तपासून बघा कोणाचे कार्यकर्ते होते. कोर्टातून हे आरक्षण रद्द व्हावे, हे प्रयत्न होते, असे आव्हाड म्हणाले.

शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी

श्री तुळजाभवानी देवीचे मंदीर हे प्राचीन आहे. त्या वास्तुचे जतन केले पाहिजे, हा जगाचा अलिखीत नियम आहे. कसेही करून प्राचीन वास्तु जपल्या जातात. परंतु या मंदिराचे काही तरी काम करण्यात आले, त्यात काही चुका झाल्या आणि आता पाणी गळती होत आहे. त्यामुळे ते पाडून टाकले जाणार आहे. तुम्हाला जे करायचे ते करा पण, मुख्य मंदीरातील देवाला आणि एकाही दगडाला हात लावू नका, कारण हे पाप आहे. उद्या पण पंढरपुरातील विठ्ठल हलवा, वणीची देवी हलवा, असे म्हणाल.

माझी काही पुजाऱ्यांशी चर्चा झाली. मी त्यांना भेटण्यासाठी तुळजापुरला जाणार आहे. गावात असंतोषाचे वातावरण आहे. मी २०१ वेळा तुळजापुरच्या देवीचे दर्शन घेतले असून तिचा मी मोठा भक्त आहे. मी कुणाला सांगून किंवा ढोल तशा घेऊन जात नाही. ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे, ती आहे त्या जागेवरच राहीली पाहिजे. ज्या जागेवर शिवरायांनी तिचे दर्शन घेतले ती पवित्र जागा आहे. मंदिराच्या एकाही दगडाला हात लावू नका. कारण मंदीराच्या प्रत्येक दगडातील अणू रेणूत देवी बसली आहे. इथे धर्म येत नाही तर, ही आमची श्रद्धा आहे, असे आव्हाड म्हणाले.