ठाणे : दहीहंड उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवात उंच-उंच थर लावण्याची तयारी गोविंदा पथकांकडून सुरू आहे. ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात दहीहंडीनिमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात. यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथके ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी येतात.
उंच थरावरून पडून गोविंदा जायबंदी किंवा मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या कुटूंबियांना काहीच मदत मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गोविंदांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र, त्यातील किचकट अटींवर बोट ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ( Kedar dighe) यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेला सण आहे. या सणाला नवे रूप, नवा उत्साह देण्याचे कार्य धर्मवीर आनंद दिघे यांनी केले होते. त्यांनी दहीहंडी सणाला एक सांघिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा उत्सव म्हणून समाजासमोर उभा केला. त्यामुळेच आज हा सण लाखो भाविकांच्या भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबवणे हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेसाठी तयार करण्यात आलेला अर्ज अत्यंत किचकट, अव्यवहार्य आणि लहान-मोठ्या गोविंदा पथकांसाठी अन्यायकारक आहे, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.
अटी लादणे म्हणजे सणाच्या आनंदावर पाणी फेरणे
या अर्जामध्ये दोन वेळा मंडळाचे नाव, दोन मोबाईल नंबर आणि दोन ईमेल आयडी मागण्याचा अर्थ काय? हे फक्त गोंधळ निर्माण करणारे आहे. प्रत्येक फील्डवर स्टार मार्क ठेवून जबरदस्तीने सर्व माहिती भरण्यास भाग पाडले जात आहे. एखाद्या माहितीचा अभाव असल्यास फॉर्म नाकारला जाणार का, मग गरीब आणि ग्रामीण भागातील पथकांचे काय, असा प्रश्न केदार यांनी उपस्थित केला आहे.
मंडळाच्या लेटरहेडवरचा अर्ज आणि सर्व गोविंदांची यादी फक्त १ एमबी (1 MB ) च्या पीडीएफ (PDF) मध्ये अपलोड करण्याची अट हास्यास्पद आहे. ग्रामीण भागातील मंडळांकडे अशी तांत्रिक साधने नसताना एवढ्या गुंतागुंतीच्या अटी लादणे म्हणजे सणाच्या आनंदावर पाणी फेरणे. ही योजना शासनाच्या निधीतून राबवली जात आहे, तर एवढ्या किचकट अटी असोसिएशनकडून का घालण्यात येत आहेत, हे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी विचारणा केदार दिघे यांनी केली आहे.
शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करू
दहीहंडीचा आनंद, गोविंदांची सुरक्षा, हीच खरी प्राथमिकता असावी. नियमांच्या नावाखाली सणाचे स्वरूप बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा मान ठेवत हा सण पूर्वीप्रमाणे आनंदात पार पडला पाहिजे. दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण आहे, तो कोणत्याही बोगस नियमांच्या जोखडात अडकवू नका. गोविंदांचा विमा हा हक्क आहे, उपकार नाही. शासनाने तात्काळ या अर्जामधील गुंतागुंतीच्या अटी रद्द करून ओरिएंटल इन्शुरन्स कार्यालयात एक खिडकी योजना चालू करावी आणि सोपी प्रक्रिया लागू करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासन तसेच असोसिएशन जबाबदार राहतील, असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे.