ठाणे: मुंबई उपनगरी रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या रोजच्या जीवनरेषा मानली जाते. मात्र या लोकल प्रवासात सुविधांऐवजी त्रासच जास्त सहन करावा लागत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. कल्याण लोकलमधील महिला डब्यात पाणी गळती झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शुक्रवारी याचा व्हिडिओ एका महिला प्रवाशाने स्वतः चित्रित करून सोशल मीडियावर टाकल्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
घटना विद्याविहारहून कल्याणकडे येणाऱ्या एका लोकलची आहे. आधीच गर्दीच्या वेळी प्रवाशांनी महिला डब्यातील जागा मिळवण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यात अचानक डब्यात छतावरून पाणी गळायला सुरुवात झाली. भर गर्दीत उभ्या असलेल्या महिलांना जागा बदलणेही शक्य झाले नाही. त्यामुळे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर, बॅगा, मोबाईल, कपड्यांवर पडत राहिले. काही महिला प्रवाशांना भिजलेल्या बॅगमधील वस्तूंचे नुकसानही झाले.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, “रेल्वे तिकिटांचे दर वाढत आहेत, दंड वसूल केला जातो; मात्र प्रवाशांना नीट सुविधा मिळत नाहीत. गळती होणाऱ्या डब्यांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. पाण्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचीही भीती असते.”
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असताना अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी टीका प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांनी तातडीने डब्यांची दुरुस्ती करावी, देखभाल वाढवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेत पुढील कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे प्रवासी संघटनांनी स्पष्ट केले आहे.