ठाणे – ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. पावसामुळे अनेक सखल भागांसह रस्त्यावर पाणी साचले. तसेच विविध मार्गांसह महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तर, रेल्वे गाड्यांची वाहतूकही विलंबाने सुरु होती. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले. अशातच या पावसामुळे ठाण्याच्या माजीवाडा गाव परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा अडकला. या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने नाल्याचे पाणी शेजारील वस्तीत शिरले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, नाले साफ करा अथवा पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र होते. त्याचा फटका अनेक शहरांना बसला. सोमवारी सकाळच्या सुमारास भरलेल्या शाळा दुपारी चारनंतर सोडून देण्यात आल्या. तर पावसाचा अंदाज पाहून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली. सोमवारी रात्रभर आणि सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळाले.

सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर अधूनमधून वाढत होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचत होते. ठाणे शहर, दीघा, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीणचा भाग, कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग परिसर, अंबरनाथ ग्रामीण मध्ये जोरदार पावसामुळे नाले तुडूंब भरून वाहत होते. दरम्यान ठाणे शहरातील नाल्यांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले. ठाण्याच्या माजिवडा गाव परिसरात देखील डोंगराळ भागातील पाणी वाहून नेणारा एक नाला आहे. या नाल्यातून डोंगराळ भागातून येणारे पाणी वाहत असते. अशातच या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून आल्याचे दिसून आले. या नाल्यातील कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, थर्माकॉल चे प्रमाण अधिक होते. हा कचरा नाल्याचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडकला. यामुळे पाणी जाण्यास जागा उरली नाही. दरम्यान हे पाणी नाल्या जवळील वस्तीत शिरले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरी हा कचरा लवकरात लवकर साफ करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अथवा पंपाद्वारे हे पाणी काढण्यासाठी उपाययोजना तरी करावी अशी मागणी या वस्तीतील नागरिक करीत आहेत.