Thane Metro / ठाणे : मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प वडाळा-घाटकोपर-कासारवडली (मेट्रो चार) प्रकल्पावरील मेट्रोची चाचणीची तारीख ठरली आहे. सुमारे महिनाभरापासून मेट्रो ट्रेन येथील आनंद नगर भागात उभी आहे. ही चाचणी केव्हा होईल याच्या प्रतिक्षेत ठाणेकर होते.
ठाणे शहरात नागरिकरण वाढल्याने मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा ताण मध्य रेल्वे, शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर बसत आहे. त्यामुळे ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो.
या तारखेला होणार चाचणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एमएमआरडीएकडून हालचालींना वेग आला होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो मार्गिकेवर कोच उभारणीची कामे सुरु झाली.
काही दिवसांपूर्वीच मेट्रो मार्गिकेवर मेट्रो ट्रेन सज्ज देखील झाली. नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहिती नुसार सोमवार, २२ सप्टेंबरला चाचणी होणार असल्याचे स्पष्ट झाले.
चाचणी कशी होईल
मेट्रोची चाचणी काही किमी अंतरासाठी होणार असून यामध्ये १० स्थानकावर प्राथमिक टप्प्यावर ही चाचणी होईल. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा नसल्याने ही चाचणी रखडली होती.