ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्त्वाच्या असलेल्या मेट्रो चार आणि चार अ मेट्रो प्रकल्पाची चाचणी सोमवारी झाली. ही मेट्रो २०२७ पर्यंत सुरु केली जाणार असली तरी ठाणे मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगरात भविष्यात मेट्रोचे मोठे जाळे तयार होणार आहे.
विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठा ५८ किमीचा मेट्रो प्रकल्प देखील ठाणे जिल्ह्यातूनच जाणार आहे. ठाणे शहर, नवी मुंबई, मुंबई, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, दहिसर या शहरांमध्ये रस्त्याप्रमाणे मेट्रोचे जाळे तयार होणार आहे. ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प देखील मुख्य मेट्रोला जोडला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर, नवी मुंबई, भिवंडी, मिरा भाईंदरमध्ये मोठ्याप्रामणात नागरिकरण वाढले आहे. रेल्वे वाहतुकीवर आणि रस्ते मार्गावर वाहनांचा होणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो चार (कासारवडवली-घाटकोपर-वडाळा), मेट्रो चार अ (कासारवडवली ते गायमुख), मेट्रो पाच ( ठाणे ते भिवंडी, कल्याण) या मार्गांच्या निर्मितीचे कामे ठाणे जिल्ह्यात सुरु केली. हे प्रकल्प केव्हा सुरु होईल असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गिकेची चाचणी घोडबंदर भागात झाली. त्यांतर आता या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मेट्रो चार हा प्रकल्प २०२७ मध्ये पूर्ण होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो मेट्रोच्या अनेक प्रकल्पांना जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मेट्रोचे वर्तुळच एक प्रकारे तयार होणार आहे.
ठाणे शहरातही अंतर्गत भागात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प केला जाणार आहे. हा प्रकल्प देखील त्यास जोडला जाणार असून भविष्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त केली जात आहे.
मेट्रो ट्रेनचे वैशिष्ट्य
मेट्रो ट्रेनमध्ये आधुनिक कंट्रोल आणि मॅनेजमेंट प्रणाली आहे. प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रमाणली, अडथळे शोध प्रमाली, आपत्ती परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी द्वार, उर्जा बचत प्रणाली असेल.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काय होईल?
मेट्रो मार्ग चार प्रकल्प पूर्णत्वानंतर पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर व ठाणे शहर यांच्या आर्थिक तथा व्यावसायिक केंद्रांना जोडण्यास मदत करेल. मेट्रो मार्ग चार प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा ते सी.एस.एम.टी.) असा असून उत्तरेचा विस्तार हा मेट्रो मार्ग चार अ (कासारवडावली ते गायमुख) असा असेल. त्यानंतर प्रस्थावित मेट्रो मार्ग १० (गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे मीरा गाव पर्यंत प्रस्तावित आहे. हे चारही मेट्रो मार्ग पूर्णत्वानंतर भारतातील सर्वात जास्त लांबी असा अंदाजित ५८ कि.मी. चा उन्नत मार्ग उपलब्ध होऊन दैनंदिन २१.६२ लक्ष प्रवाशांना त्याचा लाभ होईल असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
तसेच मेट्रो पाच प्रकल्प देखील ठाणे शहरातूनच असेल. ठाण्यातील कापूरबावडी येथून पुढे भिवंडी आणि त्यानंतर कल्याण असा हा प्रकल्प असेल. कल्याण येथून तळोजा असा प्रस्तावित मेट्रो १२ प्रकल्प असेल. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई शहरे मेट्रो मार्गाने जोडले जातील.
इंटरचेंज स्थानके कोणती?
१) गायमुख स्थानक – प्रस्थावित मेट्रो मार्गिका १० (गायमुख ते मीरा-भाईंदर समवेत जोडणी)
२) डोंगरीपाडा स्थानक (ठाणे वर्तुळाकार मेट्रो समवेतजोडणी)
३) कापुरबावडी स्थानक – मेट्रो मार्गिका ५ (ठाणे ते कल्याण) समवेत संयुक्त जोडणी.
४) गांधी नगर स्थानक – मेट्रो मार्गिका ६ (स्वामीसमर्थ नगर ते विक्रोळी) समवेत जोडणी
६) सिद्धार्थ कॉलनी स्थानक – मेट्रो मार्गिका २ (डी.एन. नगर ते मंडाले) समवेत जोडणी
७) भक्ती पार्क स्थानक – प्रस्तावित मेट्रो मार्गिका ११ (वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) समवेत जोडणी
८) भक्ती पार्क स्थानक – मोनोरेल समवेत जोडणी.
प्रकल्प पूर्ण केव्हा होणार
- मोघरपाडा डेपो
- मेट्रो प्रकल्प चार, ४अ, मेट्रो मार्ग ११ आणि १० असे चारही मार्गासाठी ४५.५ हेक्टर जागेत बांधला जाईल. हा प्रकल्प तीन टप्प्यात केला जात आहे.
- टप्पा-१ – (गायमुख ते कॅडबरी जंक्शन १०.५ कि.मी., एकूण १० स्थानके एप्रिल २०२६ आणि ०४ स्थानके डिसेंबर, २०२५)
- टप्पा २ – (कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर ११ कि.मी., ११ स्थानके) एकूण २१ स्थानके ऑक्टोबर, २०२६.
- टप्पा-३- (गांधी नगर ते वडाळा १२ कि.मी., ११ स्थानके) एकूण ३२ स्थानके ऑक्टोबर, २०२७.