Thane Metro Trial Run News / ठाणे : ठाणे ते वडाळा (मेट्रो चार) मार्गिकेवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घोडबंदर येथील गायमुख ते विजय गार्डन या चार किमी अंतरासाठी मेट्रो मार्गिकेची चाचणी होणार आहे. परंतु ठाणेकरांमध्ये मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

चाचणी सुरु असली तरी मेट्रो मार्गिका केव्हा पूर्ण होणार, कारशेड उपलब्ध नाही तर मग चाचणी कसली, मेट्रोची चाचणी पण वाहतुक कोंडीचे काय, तर काहींच्या मते मेट्रो धावली तर आता घोडबंदरचा कायापालट होईल अशा चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे शहरात वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पाची उभारणी सध्या ठाणे शहरात सुरू आहे. मेट्रो मार्गिकेच्या कासारवडवली – घाटकोपर-वडाळा या मेट्रो चार आणि आणि कासारवडवली स्थानकालाच जोडून कासारवडवली ते गायमुख मेट्रो चार अ प्रकल्प तयार केला जात आहे. सोमवारी या मार्गिकेवर मेट्रो वाहतुकीची चाचणी करण्यात येत होती.

मेट्रो चाचणी अन्…

समाजमाध्यमे, वृत्तपत्रांमध्ये मेट्रोची चाचणी होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. अन् ठाणेकर मेट्रोच्या स्वप्नात रंगू लागले. घोडबंदरमध्ये तर घरा-घरामध्ये चर्चा होत आहेत. आता आपल्या दारातून मेट्रो जाणार या आशेने काहींच्या मनात आनंद होता. तर काहीजण मात्र संभ्रमात होते. चाचणी सुरु असली तरी मेट्रो मार्गिका केव्हा पूर्ण होणार, कारशेड उपलब्ध नाही तर मग चाचणी कसली, मेट्रोची चाचणी पण वाहतुक कोंडीचे काय, तर काहींच्या मते मेट्रो धावली तर आता घोडबंदरचा कायापालट होईल अशा चर्चांना उधाण आले आहे.

ठाण्यात वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारने आता लक्ष देणे गरजेचे असल्याचे काहींचे मत आहे. तर काहीजण आता आपला प्रवास सुलभ होणार ही आशा उराशी बाळगून आहेत.

कसा आहे प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गावर ३० स्थानकांसह एक किमी लांबीचा एलिवेटेड कॉरिडॉर आहे. यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, मध्य रेल्वे, मोनो रेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग २-बी (डी एन नगर ते मंडळे), मेट्रो मार्ग ५ (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोली) यांच्यात आंतरजोडणी उपलब्ध होईल. नागरिकांच्या वेळेमध्येही यामुळे बचत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.