ठाणे : नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. मतदारांच्या नोंदणीत सुलभ शौचालय, पामबीच रस्ता असे वेगवेगळे पत्त्यांची नोंद झाली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीका केली होती. परंतू, यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दुबार आणि खोट्या मतदारांविषयी नागरिकांना कळावे यासाठी खोट्या मतदारांचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यात सध्या सर्वत्र मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर, मतदार याद्यांमधील घोळ दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मतदार याद्यांमधील चूका दाखविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर ५५० मतदारांनी नावे नोंदवली, एकाचा तर पत्ता सुलभ शौचालय असल्याचे राज ठाकरे यांनी एका भाषणात सांगितले होते. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे नोंदवण्यात आली असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षाच्या मेळाव्यात उपस्थित केला होता. परंतू, निवडणूक आयोगाला यावर उत्तर देता आले नाही.
नवी मुंबईच्या मतदार यादीतील सुलभ शौचालय, पालिका आयुक्त निवास, पामबीच रोडनंतर आणखी अनेक घोळ समोर आले आहेत. मनसेने यावर वारंवार आवाज उठवला आहे. निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभाराचे धक्कादायक खुलासे सर्वांसमोर यावे यासाठी मनसे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ आयोजित केले आहे. खऱ्या मतदारांनी खोट्या मतदारांचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी नक्की या असे आवाहन त्यांनी नवी मुंबईकरांना केले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाशी येथील सेक्टर ९ ए जवळील दैवज्ञ भवन सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
