शहापूर : शहापूर तालुक्यातील चेरपोली येथे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास चोरीची घटना घडली. किराणा दुकानात बसलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. या घटनेत एका चोरट्याला नागरिकांनी पकडून शहापुर पोलिसांच्या ताब्यात दिले, तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चेनस्नॅचर्सची भीती पसरली आहे.
शहापूर येथील चेरपोली हद्दीतील महाराष्ट्र प्रोव्हिजन या दुकानात मालक सुमित बजरंग अग्रवाल आणि त्यांची आई बसल्या होत्या.

रात्री साडे आठच्या सुमारास दोन चोरटे दुचाकीवरून आले. चोरट्यांपैकी एकाने ग्राहक असल्याचे भासवून दुकानात प्रवेश केला, तर दुसरा साथीदार दुचाकीवर थांबला होता. दुकानात शिरल्यावर त्या चोरट्याने अग्रवाल यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या वृद्ध महिलेने आरडा-ओरड केली. त्यामुळे पलायन करायच्या तयारीत असलेल्या चोरट्यांचा गोंधळ उडाला त्यामुळे त्याची दुचाकी खाली पडली. त्याचवेळी दक्ष नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला मोठ्या शिताफीने पकडून चोप दिला व शहापुर पोलिसांच्या ताब्यात दिले. सोन्याचे मंगळसूत्र घेऊन त्याचा साथीदार मात्र फरार झाला. पोलिसांच्या ताब्यातील चोरटा देवेंद्र वडेरा उत्तर प्रदेश येथील असून फरार झालेल्या चोरट्याचा पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव शोध घेत आहेत.