ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका भागात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. ही घटना इतकी भीषण होती की संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग हा ठाणे, मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हजारो वाहने मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करतात. या मार्गावर अनेकदा वाहतुक कोंडी होत असते. वाहतुक अधिक प्रमाणात होत असल्याने पोलीस देखील मुख्य चौकात तैनात असतात.

काय झाले ?

पूर्व द्रुतगती महामार्गावरुन कार चालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होता. त्याची कार महामार्गावरील तीन हात नाका सिग्नल परिसरात बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आली असता, कारने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नौपाडा पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीमध्ये कार जवळपास जळून खाक झाली होती. या घटनेत आग लागताचक्षणी कार चालकाने पळ काढला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.