ठाणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवारी गायमुख ते कल्याण फाटा या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे ठाणे शहरात दिवाळीपूर्वी स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

या मोहिमेत महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची यांत्रिक स्वीपिंग मशीनद्वारे सफाई करण्यात आली. तसेच त्याचवेळी या संपूर्ण पट्ट्यात एकूण ३०० सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही सफाई करण्यात आली. हे सफाई कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यरत होते. तीन डम्पर भरून कचरा उचलण्यात आला, तर काही ठिकाणी कचरा उचलण्यासाठी जेसीबी यंत्रांचाही वापर करण्यात आला.

या मोहिमेत उपायुक्त जोशी यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी अंबाजी, तसेच उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सफाई निरीक्षक यांनी देखील सहभाग घेतला.

म्हणून विशेष स्वच्छता मोहीम

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले की, “दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गायमुख ते कल्याण फाटा हा महामार्ग नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.”

यापूर्वीही अभियान राबविले

ठाणे शहरातील विविध प्रभागांत यापूर्वीही पालिकेने अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. दिवाळीपूर्वीच्या या मोहिमेद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह “स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे” या संकल्पनेला बळकटी मिळाली आहे. नागरिकांनी घरगुती कचरा वेगळा करून देणे, रस्त्यावर कचरा न टाकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सूचनाही देण्यात आल्या.पालिका प्रशासनाने पुढील काही दिवसांत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि रिंग रोड परिसरातही अशीच व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन केले असून, ठाणेकरांना स्वच्छ आणि आनंददायी दिवाळीचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.