ठाणे : ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि चौकात उभारण्यात आलेले जाहीरात फलक यंदाच्या पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील २७६ जाहीरात फलक कंपनी मालकांना प्रशासनाने नोटीसा बजावून २५ मे पर्यंत फलकाच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. हे प्रमाणपत्र सादर केले नाहीतर कारवाईचा इशाराही दिला असून आतापर्यंत ५० कंपन्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस होत आहे. या पावसादरम्यान शहरातील वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच जाहीरात फलक पडण्याचे प्रकार घडतात. काही वेळेस जाहीरात फलकाचा पत्राही उडून खाली पडतो. गेल्यावर्षी मुंबई येथील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या अपघातात काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. या घटनेनंतर राज्यातील सर्वच शहरांप्रमाणे ठाणे शहरातील जाहीरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला. या अपघातानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील जाहीरात फलक कंपन्यांना नोटीसा बजावून त्याच्याकडून जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र घेतले होते. तसेच शहरातील ४९ बेकायदा जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली होती.
४९ पैकी ५ जाहिरात फलक पुर्णपणे निष्कासित करण्यात आले होते, तर परवानगी पेक्षा जास्त आकाराच्या ४४ जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. ठाणे महापालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे गेली कित्येक वर्षे जाहिरातबाजी करून पैसे कमविणाऱ्या जाहिरात फलक मालकांना दंडाची नोटीस पाठविली होती. यंदाच्या वर्षातही ठाणे महापालिकेने पुन्हा शहरातील जाहीरात फलक कंपनी मालकांना नोटीसा बजावून २५ मे पर्यंत फलकाच्या लोखंडी सांगाड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. हे प्रमाणपत्र सादर केले नाहीतर जाहीराती उतरवण्यात येतील, असा कारवाईचा इशाराही दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत २७६ जाहीरात फलक आहेत. शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग आणि प्रमुख चौकात हे जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत. गेल्यावर्षी अनेक जाहीरात कंपनी मालकांनी पालिकेच्या नोटीसनंतर दोन ते पाच वर्षांचे जाहीरात फलक सांगड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, या सर्वांना पालिकेने पुन्हा नव्याने स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आतापर्यंत ५० कंपन्यांनी प्रमाणपत्र सादर केले असून उर्वरित कंपन्यांनी येत्या काही दिवसात स्थैर्यता प्रमाणपत्र सादर होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जाहीरात फलक कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. जाहीरात फलक सांगड्याचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटीसा कंपन्यांना दिल्या आहेत. तसेच जाहीरात फलकांचे पत्र निघाले आहेत का किंवा बेकायदा जाहीरात फलक उभारण्यात आलेले आहेत का याची पुन्हा पाहाणी करण्याच्या सुचना विभागाला दिल्या आहेत.
प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका