ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यवसायिक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात असताना ही धमकी आली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांना काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. बांधकाम व्यवसायिकाला विकसित करण्याच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले होते. बांधकाम व्यवसायिक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या कार्यालयात गुरुवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.

बांधकाम व्यवसायिक हे सुहास शिंदे यांच्या कार्यालयात असतानाच, त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला. पहिल्यांदा त्यांनी संबंधित काॅलला प्रतिसाद दिला नाही. परंतु काहीवेळाने त्यांना पुन्हा एकदा काॅल आला. त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली. या धमकीचे संभाषण त्यांच्या मोबाईलमध्ये जतन झाले आहे. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.