ठाणे : टेंभीनाका येथील भवानी चौकात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. ठाणे, पालघर, मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली आहे. हे वाहतुक बदल दररोज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.

ठाणे रेल्वे स्थानक येथून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना टाॅवर नाकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गडकरी चौक, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गे वाहतुक करतील. गडकरी चौक येथून टाॅवरनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल.

येथील वाहने गडकरी चौक, दगडीशाळा चौक, अल्मेडा चौक मार्गे वाहतुक करतील. चरई येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना धोबीआळी जवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धोबीआळी चौक, डाॅ. सोमुनिया रोड, धोबीआळी मशीद, जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गे वाहतुक करतील.

कोर्टनाका येथून आनंद आश्रम मार्गे टाॅवरनाका येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने स्मारकाजवळून जांभळीनाका, टाॅवरनाका मार्गे वाहतुक करतील. दगडीशाळा चौक येथून वीर सावरकर रोड मार्गे टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स दुकानाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दांडेकर ज्वेलर्स येथून डावे वळण घेऊन उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्गे, धोबीआळी चौक, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून वाहतुक करतील.

वाहने उभी करण्यास मनाई

दगडी शाळा, सेंट जाॅन बॅपिस्ट शाळा, दांडेकर ज्वेलर्स दुकान परिसर, उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग, अहिल्यादेवी उद्यान परिसर, धोबीआळी, डाॅ,. सोनुमिया रोड ते जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गालगत वाहने उभी करण्यास मनाई असेल.