ठाणे : ठाणे महापालिकेतील निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. पाटोळे यांच्यासह तिघांना २५ लाख रुपये घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. दोन तास युक्तीवाद झाल्यानंतर तिघांचेही जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळले.
जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाकडून त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. याप्रकरणात पाटोळे यांच्यासह तिघांना अटक झाली होती.
पाटोळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाटोळे यांना सेवेतूनही निलंबित केले होते. शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. शिंदे यांच्या न्यायालयात युक्तीवाद झाला. याप्रकरणाचा तपास सुरु असल्याने पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी जामीन फेटाळल्याचे न्यायालयाने म्हटले. यावेळी न्यायाधीश शिंदे यांनी पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांना पाच दिवस मिळालेल्या पोलीस कोठडीत काय तपास केला असे विचारत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.
येत्या काही दिवसांत दिवाळी आहे. त्यामुळे पाटोळे यांच्यासह तिघांना उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे. परंतु दिवाळीत न्यायालय बंद असेल. त्यामुळे ही दिवाळी पाटोळे यांना कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.