ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील वंदना आगारातून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बस गाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला होता. या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच आता या दुरावस्था झालेल्या ठाणे-कोल्हापूर बसचा तीन वर्षांपुर्वीच वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) संपुष्टात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच विमा (इन्शुरन्स) संपून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि पियूसी देखील नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे शिवशाही बसमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे ५.१५ वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते. शुक्रवारी सकाळी ही बस पाऊण तास उशिराने सोडण्यात आली होती. त्यामुळे स्थानकात बसची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवताच त्यांना बसची अवस्था पाहून धक्का बसला होता. बसच्या चालकाला समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता,फाटलेल्या सीट, उखडलेले पत्रे, असे चित्र प्रवाशांना दिसून आले. या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोनवरुन संपर्क साधत याबाबत माहिती दिली.
तसेच त्याचे पुरावे म्हणून बस गाडीच्या दुरावस्थेबाबत केलेले चित्रीकरण पाठवले. यानंतर पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या बसबाबत पिंगळे यांनी अधिक माहिती घेतली असता, त्यात तीन वर्षांपुर्वीच या बसचे वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) संपुष्टात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच विमा (इन्शुरन्स) संपून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि पियूसी देखील नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) असणे गरजेचे आहे. कारण, वाहन योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या सार्वजनिक बस गाड्यांचा अपघात झाल्यास विम्याचा लाभही मिळू शकत नाही. असे असतानाही वाहन योग्यता प्रमाणपत्र, विमा आणि पियूसी नसलेली धोकादायक बस महामंडळाकडून प्रवाशांच्या आरामदायी सेवेच्या नावाखाली चालवून नागरिकांचे जीव धोक्यात घातले जात आहेत, असे पिंगळे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राज्य महामार्ग महामंडळाकडून चालवण्यात येणाऱ्या बसगाड्या सुस्थितीत आहेत का, याची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी. त्यात वाहन योग्यता प्रमाणपत्रासह वाहनाचा विमा, पीयूसी याची माहिती घेऊन एसटी महामंडळास प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कायद्याचे सक्त पालन करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.