माथाडी कामगार पुरविणारा ठेकेदार गणेश कोकाटे याच्या गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुमारे महिन्याभरानंतर दोघांना अटक केली आहे. धनराज तोडणकर (३३) आणि संदीपकुमार कनोजिया (२७) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पूर्ववैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> दिव्याचे सिंगापूर करण्याच्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के भाजपच्या रडारवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथील कशेळी भागात सुमारे महिन्याभरापूर्वी गणेश कोकाटे या माथाडी कामगार पुरवणाऱ्या ठेकेदाराची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान, यातील आरोपी हे वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाला होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने इंदिरानगर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. धनराज आणि गणेश कोकाटे याचे काही वर्षांपूर्वी वाद झाले होते. या वादातून गणेश याने धनराजला भर रस्त्यात मारहाण केली होती. त्याचा राग धनराजच्या मनात होता. त्यामुळे त्याने मित्र संदीपकुमारच्या मदतीने ही हत्या त्याने केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. धनराज हा कुख्यात असून त्यांच्यावर यापूर्वी मारहाण, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयानेही त्याला फरार घोषीत केले होते. असेही पोलिसांनी सांगितले.