ठाणे : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी या अमली पदार्थाचा कारखाना उद्धवस्त केला. हा कारखाना एका कपड्याच्या दुकानातील गाळ्यामध्ये सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोटी ३० लाख ४९ हजार ६०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. उत्तरप्रदेश येथे पाच दिवस वेशांतर करुन पोलिसांनी आरोपींवर लक्ष ठेवले होते. यातील एक आरोपी विज्ञान शाखेतील पदवीधर आहे. रसायनांचा वापर करुन तो अमली पदार्थ तयार करत होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
मोहम्मद कय्युम मोहम्मद युनुस हाशमी (४५), बिपीन पटेल (४९) आणि देवेश शर्मा (३२) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंब्रा येथील दत्तुवाडी परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, १७ एप्रिलला पथकाने सापळा रचून देवेश शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे ६७ लाख २० हजार रुपये किमतीचा ३३६ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थाचा साठा आढळून आला. पथकाने त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याला हा साठा उत्तरप्रदेशच्या कय्युम कडून मिळाल्याचे सांगितले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के यांनी पथके तयार केली. त्यानुसार, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन कय्युमचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो अयोध्या येथे राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार हरीश तावडे, अमोल देसाई यांचे पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले.
तपासा दरम्यान कय्यमु याचे अयोध्या येथील सोहावल परिसरात कापड विक्रीचे दुकान असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने वेशांतर करुन त्याच्यावर लक्ष ठेवले. तसेच कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याच्या दुकानाची, परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या गाळ्याच्या मागे त्याने एमडी हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी त्याने कारखानाच बनविल्याचे समोर आले. तो अमली पदार्थ बनवित असल्याचे समोर आल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पोलीस हवालदार हेमंत महाले, पोलीस नाईक अनुप राक्षे, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांचे दुसरे पथक उत्तर प्रदेशात पोहचले. पथकाने उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स पथकाच्या मदतीने दुकानात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी कय्युम आणि त्याचा साथिदार बिपीन पटेल याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
बिपीन हा उच्च शिक्षित असून तो विज्ञान शाखेतील पदवीधर आहे. त्याला रसायनांचा वापर करुन एमडी हे अमली पदार्थ बनविता येत होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच तो मध्य प्रदेशच्या महसूल गुप्तचर संचनालयातील पाहिजे असलेला आरोपी आहे. गुजरातमध्येही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर कय्युम विरोधात उत्तरप्रदेशातील रौनाही, इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणि मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.