ठाणे : ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरात दिवाळी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलीस विभागासाठी ५० पोलिसांचा आणि परिमंडळ (ठाणे शहर) एक विभागासाठी १५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे आकाश कंदील देखील हवेत उडविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दिवाळी निमित्ताने सोमवारी दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित केला जातो. विविध राजकीय पक्षांकडून सामाजिक संस्थेच्या नावाने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील विविध भागातून तरुण-तरुणी ठाणे, कल्याण, डोंबिवली भागात गर्दी करतात. उत्सवात गैरप्रकार, चोरी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या भागात नौपाडा पोलिसांसोबत मुख्यालयातील सुमारे १५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
डोंबिवली आणि कल्याण भागातही तेथील पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. कार्यक्रमांच्या आयोजनामुळे वाहतुक व्यवस्थेवर त्याचा मोठ्याप्रमाणात ताण येत असतो. त्यामुळे मुख्यालयातून वाहतुक पोलीस विभागास ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असेल. याशिवाय वाहतुक साहाय्यकही ठिकठिकाणी नेमले जाणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहे. अनेकजण दिवाळीनिमित्ताने हवेमध्ये आकाश कंदील उडवितात. त्यांनाही प्रतिबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
उत्सवाच्या कालावधीत प्रवेशबंदी
राम मारूती रोड परिसरातील गजानन चौक ते तीन पेट्रोल पंप या मार्गावरून हजारो वाहने दगडी शाळा, चरई भागात वाहतुक करतात. ठाणे पोलिसांनी दिवाळी निमित्ताने वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून तीन पेट्रोल पंप येथून गजानन चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. येथील वाहने गणेशमूर्ती कारखाना, हरिनिवास चौक किंवा वंदना एसटी आगार येथून वाहतुक करू शकतील.
ज्या ठिकाणी पोलीस बळाची गरज आहे. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठीही अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. आकाश कंदिलांनाही उडविण्यास प्रतिबंध असेल. – मीना मकावाना, उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे पोलीस.