उल्हासनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी परिमंडळ चारच्या पोलिसांकडून शनिवारी अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये व्यापक ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून स्थानिक नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक होत आहे.
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २५० जणांचे पथक तैनात करण्यात आले होते. यात ४६ पोलिस अधिकारी आणि २०५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान दारूबंदीचे ९ गुन्हे, तसेच अमली पदार्थांबाबत १० गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय हद्दपारीतील ६ आरोपींपैकी ४ जणांना अटक करण्यात आली, तर उर्वरित २ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या.
यावेळी तिन्ही शहरांतील ९८ लॉज आणि बारची तपासणी करण्यात आली तसेच एकूण १५३ सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. आर्म्स एक्टअंतर्गत ३ आरोपींना अटक, तर एकाला नोटीस देण्यात आली. याशिवाय, प्रतिबंधात्मक कारवाईत १४ ठिकाणी नाकाबंदी करून तब्बल २९६ वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून ८६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव तसेच आगामी सर्व सणोत्सव काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सतत सज्ज आहेत.”
नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे गणेशोत्सव काळात शहरांमध्ये शांतीपूर्ण आणि सुरक्षित वातावरण राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.