ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रासह मुंबईतील विक्रोळीपर्यंतच्या मोठ्या गणेश मुर्तींचे विसर्जन कळवा येथील पारसिक रेतीबंदर खाडीत करण्यात येते. या घाटावर येणाऱ्या गणेश मुर्तींची संख्याही मोठी असते आणि पहाटेपर्यंत या गणेश मुर्तींचे विसर्जन होत असते. परंतु यंदा याठिकाणी ठराविक उंचीपर्यंतच्या गणेश मुर्तीचे विसर्जन होऊ शकणार असून त्याचे कारण ठाणे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. या मंडळांच्या गणेश मुर्ती मोठ्या असतात. त्यांची उंची १० फुटांच्या पुढेच असते. ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनामुळे तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. परंतु याठिकाणी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात येते. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्तींचे विसर्जन कोलशेत, पारसिक रेतीबंदरच्या खाडीत करण्यात येते.

यातही पारसिक येथे मोठ्या उंचीच्या मुर्ती विसर्जनासाठी येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच पारसिक रेती बंदरचा विसर्जन घाट असून यामुळे या मार्गे घाटावर जाणे गणेश भक्तांना सोयीचे वाटते. त्यामुळे या घाटावर गणेश मुर्ती विसर्जनासाठी येण्याचा प्रमाण सर्वाधिक असते.

गणेश मुर्ती विसर्जनासाठी ही काळजी घेतली जाते

ठाणे महापालिका क्षेत्रासह मुंबईतील भांडूप आणि विक्रोळीपर्यंतच्या मोठ्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी पारसिक रेती बंदर घाटावर येत असतात. याठिकाणी ठाणे महापालिका बाज आणि विसर्जनासाठी कर्मचारी तैनात करते. याशिवाय, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. सायंकाळपासून येथे गणेश मुर्ती विसर्जनास सुरूवात होते. पहाटेपर्यंत येथे गणेश मुर्ती विसर्जन सुरूच असते. त्यामुळे शहरातील सर्वात मोठा विसर्जन घाट म्हणून हा घाट ओळखला जातो.

याठिकाणी गणेश मुर्ती विसर्जन करताना अडथळे निर्माण होऊ नये यासाठी प्रखर विद्युत दिवे बसविण्यात येतात. मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंब्रा बाह्यवळ मार्ग येथून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहतूकीमुळे गणेश मुर्ती विसर्जन काळात कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येते.

यंदा पारसिक येथे ठराविक उंचीच्या मुर्तीचे विसर्जन

ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, फिरती विसर्जन व्यवस्था अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याठिकाणी घरगुती तसेच सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्तींचे विसर्जन कोलशेत, पारसिक रेतीबंदरच्या खाडीत करण्यात येते. ३० फुटांपर्यंतच्या मुर्ती येथे विसर्जनासाठी येतात. परंतु यंदा १५ फुटांपेक्षा जास्त उंचीची मुर्ती येथे विसर्जन करता येणार नसून त्याचे कारण ठाणे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत सांगितले.

मुंबई-नाशिक महामार्गावर लोढा वसाहतीसमोर एक पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाखालून १५ फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्ती जाऊ शकतील. गेल्यावर्षीच ही समस्या समोर आली होती. यंदा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आल्याने रस्ता आणि पुल यातील उंची कमी झाली आहे. त्यामुळे १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्ती कोलशेत विसर्जन घाटावर न्याव्या लागणार आहेत, असे शिरसाट म्हणाले.