ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून ठिकठिकाणी नवरात्रौत्सव आयोजित केला जाणार आहे. नवरात्रौत्सवात दांडिया, गरबा आणि देवीच्या दर्शानावेळी गैरप्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून आयुक्तालय क्षेत्रात सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड टाळण्यासाठी साध्या वेशात पोलीस कार्यक्रमाठिकाणी तैनात असतील. रात्री रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांसोबत गैरप्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी दामिनी पथकाची नेमणूक केली आहे.
ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. तेथील वाहतुक पर्यायी मार्गाने वाहतुक पोलिसांनी वळविली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ठाणे शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जाते. यावर्षी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ५९० ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ५०० ठिकाणी गृहसंकुलाच्या आवारात किंवा इतर खासगी क्षेत्रात नवरात्रौत्सव साजरी होणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या दिवसांत रात्री गरबा, दांडिया किंवा महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विविध भागातून महिला नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी जातात. पंरतु काहीजण या गर्दीचा गैरफायदा घेत चोरीचे प्रकार घडतात. तर काही हुल्लडबाजांकडून मारहाणीचे किंवा महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने काही महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची पथकेही तयार केली आहेत. या पथकातील कर्मचारी साध्या वेशामध्ये असणार आहेत. गैरप्रकार आणि छेडछाड करणाऱ्यांविरोधात ही पथके कारवाई करतील. तसेच मंडपामध्येही वर्दीवर काही पोलीस कर्मचारी उपस्थित असतील. देवी दर्शनादरम्यान गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे पोलीस अधिकारी-कर्मचारी स्वंयसेवकांच्या मदतीने लक्ष ठेऊन असतील.
हुल्लडबाजांकडून केली जाणारी धक्काबुक्की आणि चोरट्यांवरही या कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकाऱ्यांचीही ठिकठिकाणी नेमणूक असेल. रात्री उशीरापर्यंत आयोजित दांडिया, गरबा कार्यक्रमामुळे रस्त्यावरही पोलिसांकडून गस्ती घातली जाणार आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ८०० गृहरक्षक दल, मुख्यालय, विशेष शाखा यांच्यासह विविध विभागातील तीन हजार कर्मचारी, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांचा सामावेश असणार आहे.
काही प्रसिद्ध नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी रात्री मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. ठाणे पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडविले जाणार आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे.