ठाणे : कल्याण तहसील कार्यालयाच्या आवारातच नवजात बालकाची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. याबाबत बालकाचे आई वडील आणि अवैध पद्धतीने मुल दत्तक घेण्याच्या तयारीत असलेले दाम्पत्य यांच्या विरोधात जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून कल्याण येथील महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हा महिला व बालविकास विभाग, ठाणे यांच्या चाईल्ड हेल्पलाईन तर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तर आर्थिक परिस्थिती नसल्याने बालकाची एक लाख रुपयांना विक्री करत असल्याची कबुली आई वडिलांनी दिली आहे.

जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून अवैध पद्धतीने लहान बालकांची दत्तक प्रक्रिया राबविल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येते. याच पद्धतीने जिल्हा महिला बालविकास विभागाच्या समन्वयक अधिकारी यांना चाईल्ड हेल्पलाईन माहिती मिळाली की एक दाम्पत्य कल्याण तहसील कार्यालयात मुलाची दत्तक प्रक्रिया राबविण्यासाठी परस्पर कागदपत्रे तयार करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ कल्याण तहसील कार्यालय गाठले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार एक दाम्पत्य नवजात बालकासह आणि दुसरे दाम्पत्य दत्तक घेण्यासाठी उपस्थित असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलीसांची मदत घेतली.

पोलिसांच्या उपस्थितीत विचारपूस केल्यानंतर बालक घेणारे रायगडचे दाम्पत्य यांनी सांगितले की, त्यांना मुलगा न झाल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीच्या दाम्पत्याकडून नवजात बालक घेण्याचे ठरवले. तर बाळाची विक्री करणाऱ्या दाम्पत्याने पोलीस चौकशीत सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे व बाळाच्याआईच्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी बालकाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने बालक ओळखीच्या दाम्पत्याला देण्याचे ठरविले.

त्याबदल्यात एक लाख रुपये घेण्याचे ठरले असून त्यापैकी २० हजार रुपये त्यांनी स्वीकारल्याचेही त्यांनी कबूल केले. या नवजात बालकाचा जन्म २६ सप्टेंबर २०२५ रोजी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये झाला होता. सध्या हे बालक जिल्हा बालकल्याण समिती, उल्हासनगर यांच्या निर्देशानुसार ‘जननी आशीष चारिटेबल ट्रस्ट’, डोंबिवली येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी दोन्ही दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बेकायदेशीर दत्तक व्यवहारांचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले असून, महिला व बालविकास विभागाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बाळाची खरेदी करणाऱ्या दाम्पत्याने सांगितले की माझ्या पत्नीचे या आधी दोन वेळेस गर्भपात झाले आहेत. पत्नी पुन्हा गरोधर राहिल्यास तिच्या जीविताला धोका होता. यामुळे आम्ही बाळ दत्तक घेण्याचे ठरविले. तर बाळाची विक्री करणारे दाम्पत्य हे बिगारी काम करणारे आहेत. त्यांना एक मुलगा आहे. मात्र या बालकाचे पालन पोषण करण्याची आमची आर्थिक कुवत नसल्याने आम्ही बाळ दत्तक देण्याचे ठरविले असे या दाम्पत्याने पोलिस चौकशीत सांगितले.