ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ठाणे पोलिसांनी ड्रोन उडविण्यास तसेच इतर मानवरहित हवाई वस्तू उडविण्यास मनाईचे आदेश दिले आहे. भारत पाकिस्तान संघर्षानंतर मुंबई पोलिसांनी ड्रोन उडविण्यास बंदी घातल्यानंतर आता ठाणे पोलिसांनी देखील ड्रोन बंदीचे आदेश लागू केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ३ जून पर्यंत हे आदेश लागू असतील असेही स्पष्ट करण्यात आले.

भारत पाकिस्तान देशामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी शहरात ड्रोन उडविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी देखील ड्रोन बंदीचे आदेश लागू केले आहेत. लग्न समारंभ किंवा कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात ड्रोनचा वाप होतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या भागात ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडवण्यास मनाई असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. ठाणे पोलीस विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.