ट्रेंडिंग : ठाणे : सध्या समाजमाध्यमावर छायाचित्र अपलोड करुन विविध ट्रेंड सेट करण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत. परंतु हे घातक ठरू शकते अशी सतर्कतेची सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) आधारे तुमच्या छायाचित्राचा गैरवापर करुन तुमच्या संपूर्ण आयुष्याचाच घात होऊ शकतो. ठाणे पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

इंटरनेच्या जगात समाजमाध्यमांवर लाईक, फाॅलोवर्स, सबस्क्राईबर मिळविण्यासाठी अनेकजण त्यांचे छायाचित्र, व्हिडीओ विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करतात. प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्यांचे, राजकीय नेत्यांचे छायाचित्र वापरून एआय तंत्रज्ञानाच्या आधारे त्याचा गैरवापर करुन अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. आता सर्वसमान्य नागरिक विशेषत: महिला, तरुणी या देखील असुरक्षित आहेत. एआय या तंत्रज्ञानाचा गैर वापर वाढल्यास काय होऊ शकते याची कल्पना करा. ठाणे पोलिसांनीही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.

पोलिसांनुसार, लोक बहुतेक वेळा “स्टोरीसाठी” किंवा मित्रांसाठी ठेवलेले फोटो कुठे जातात, कोण त्यांचा वापर करतो याची कल्पना ठेवत नाहीत. परंतु आजकालचे एआय आधारित साधने आणि मोफत उपलब्ध ॲप्स एका क्लिकमध्ये चेहरा बदलून किंवा फोटो मॉर्फ करून चुका संदर्भातील प्रतिमा तयार करू शकतात. या प्रतिमांचा वापर करून प्रत्यक्ष व्यक्तींचे फोटो डार्क वेबवर विकले जातात आणि त्यावरून ब्लॅकमेलिंगही केले जातेय काही वेळा पीडितांना त्याची माहिती देखील नसते.

काय म्हणाले ठाणे पोलीस?

सोशल मीडियावर स्वतचे फोटो अपलोड करताय ? विचार करा…

  • आज तुम्ही जो फोटो फक्त “स्टोरीसाठी” टाकता, तो फोटो कुठे जातोय, कोण सेव्ह करतोय, याची तुम्हाला कल्पना सुद्धा नसते.
  • AI Deepfake तंत्रज्ञान आता इतकं सहज आणि सगळ्यांच्या हाती आलंय की एका फोटोवरून फेक, अश्लील व्हिडिओ तयार होऊ शकतो. याचा वापर करून ब्लॅकमेल करणं, फेक प्रोफाइल्स तयार करणं, फोटो मॉर्फ करणं हे आज शक्य आहे.
  • डार्क वेबवर हजारो महिलांचे फोटो विकले जातात, काही वेळेस त्यांना स्वत:लाही हे माहित नसतं.
  • इंस्टाग्राम-फेसबुकवर प्रायव्हेट खाते असूनही हजारो रिक्वेस्ट्स, ‘डीएम’ का येत असतील बरं?
  • स्क्रीनशॉट, स्क्रीन रेकॉर्डिंग, एआय टूल्स वापरून कोणताही फोटो डाउनलोड होतोच. एकदा फोटो, व्हिडिओ पोस्ट केला की तो “तुमचा” राहत नाही.
  • सोशल मीडिया ही तुमची ओळख बनवते, पण ती चुकीची कुणाच्या हाती गेली, तर आयुष्यभराची शांती हिरावते.