Mumbra Thane Train Accident : मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून १३ प्रवासी पडून त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यु झाला असून या घटनेची ठाणे रेल्वे पोलिसांकडून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत, असेही रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कासारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यामध्ये प्रथमदर्शनी दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण १३ प्रवासी गाड्यांमधून पडले. त्या सर्व जखमींना तात्काळ ठाणे रेल्वे पोलिस आणि रेल्वे पोलिस बलाने इतर प्रवाशांच्या मदतीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तीन जखमींना ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी प्रवाशांपैकी आत्तापर्यत चार प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असुन सहा जखमी प्रवाशांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारा सुरू आहेत, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलीसांकडून चौकशी सुरु असुन योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून प्रवाशांचा मृत्यु झाला. हा अपघात नेमका कसा झाला, याविषयी वेगवेगळे अंदाजे वर्तविले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कासारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यामध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण १३ प्रवासी गाड्यांमधून पडले, असे प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. असे असले तरी हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.