ठाणे – शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येत असते. या मंडळांना ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते. मात्र या मंडपांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत असते. अशातच सकाळी सायंकाळी प्रवाशांनी भरलेल्या ठाणे स्थानकातील पश्चिमेस सॅटीस पुलाखालील पायऱ्यांलगतच मंडप उभारण्यात आला आहे. वर्षानुवर्षापासून ठाणे स्थानक पश्चिमेस हा गणेश मंडप उभारला जातो. या मंडपांमुळे स्थानका भागातून ये जा करण्यास प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकाहून अनेक जण मुंबई, नवी मुंबई दिशेने प्रवास करतात. तसेच शहरातील विविध भागात कामांसाठी नागरिक येत असतात. त्याच्यासाठी ठाणे स्थानकाखाली रिक्षा थांब्याची उभारणी केली आहे. यामुळे ठाणे स्थानकाच्या पश्चिमेस कायमच गर्दीचे चित्र असते. अशातच अनेक वेळेस भिक्षेकरींकडून प्रवाशांची वाट अडवली जात असते.
ठाणे महापालिका क्षेत्रात सण आणि उत्सव रस्त्यावर साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणे आणि काही वेळेस कार्यक्रमांसाठी रस्ते अडविणे असे प्रकार सुरू असतात. यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्याचा फटका नागरिकांना बसत असतो. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही गणेश मंडप उभारण्यात आले आहे. सॅटिसच्या उतरण्याच्या पायऱ्यांच्या बाजूलाच काही भागात संघटनांनी गणेशोत्सवाचा मंडप उभारला आहे. येथील मोठ्या प्रमाणात भाग या मंडपांमुळे आडला आहे.
वर्षांभरातील अनेक सण आणि उत्सवांच्या काळामध्ये या ठिकाणी मंडप उभारला जातो. त्यामध्ये सत्यनारायणाच्या पुजेपासून ते नवरात्रीच्या उत्सवापर्यंत अनेक दिवस हा भाग मंडपाने व्यापला पाहायला मिळते. दरम्यान यंदाही सॅटिसच्या मोकळ्या जागेत हा मंडप उभारला असल्याने प्रवाशांची वाट अडवली गेली आहे. येथील गणपतीची सकाळ, सायंकाळी आरती घेतली जाते. त्यामुळे येथून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असणारा रस्ता पुर्णतः बंद होत असतो. यंदाही प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
दरवर्षी सॅटीस पुलाच्या पायऱ्यांलगतच गणेशोत्सवासाठी मंडप उभारला जातो. या मंडपांमुळे येथील मोठ्या प्रमाणावर भाग व्यापला जातो. त्यामुळे वाट अडवली जाते. तसेच अनेकदा येथे दर्शनासाठी गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकात जाण्यास त्रास होतो. – सारंग बोराडे, प्रवासी