कल्याण : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, नेरळ परिसर चौथी मुंबई म्हणून विकसित होत आहे. या भागातील बहुतांशी नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे जात आहे. या वाढत्या प्रवाशांचा विचार करून बदलापूर-चामटोली (कासगाव), वांगणी ते मोर्बे, नवी मुंबई (कामोठे) रेल्वे मार्गाचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि नियोजनकार राम पातकर यांनी केंद्रीय रस्ते आणि राज्यमार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आला तर बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, नेरळ, वांगणी परिसरातून नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचा कल्याण, ठाणे रेल्वे मार्गावरील प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कर्जत, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील नागरिकांना जायचे असेल तर त्यांना कल्याण, ठाणे रेल्वे मार्ग आणि काटई शिळफाटा मार्गा शिवाय अन्य पर्याय नाही. हा प्रवाशांचा वाढता भार विचारात घेऊन बदलापूर, वांगणी ते नवी मुंबई (कामोठे) रेल्वे मार्गाचा प्राधान्याने विचार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे पातकर यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालय हालचाली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी नगरध्यक्ष राम पातकर यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले. बदलापूर, कर्जत, अंबरनाथ परिसरात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा विचार करून या भागात बदलापूर ते वांगणी दरम्यान कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने चाचपणी करावी. तसेच, बदलापूर कासगाव ते मोर्बे ते कामोठे या नवीन रेल्व मार्गाचा प्राधान्याने विचार करावा, असे सूचित केले आहे.

बदलापूर टर्मिनस मागणी

कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवासी, मेल, एक्सप्रेस, लोकलचा वाढता भार विचारात घेऊन बदलापूर रेल्वे स्थानकाला रेल्वे टर्मिनस म्हणून जाहीर करावे. बदलापूर रेल्वे रेल्वे स्थानकात सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी एक्सप्रेसना थांबा देण्यात यावा. या रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्यात यावी. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील अनेक विद्यार्थी, नोकरदार नोकरी, शिक्षणासाठी पुणे परिसरात जातात. त्यांना या सुविधांचा लाभ होणार आहे, असे पातकर यांच्या पत्रावरून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना कळविले आहे.

याशिवाय कर्जत, पनवेल, मुंबई लोकल सेवा सुरू करावी. बदलापूर ते पुणे, टिटवाळा ते नाशिक मेमू लोकल सेवा सुरू कराव्यात. उल्हास नदीतून बदलापूर ते कल्याण खाडीतून जलवाहतूक सुरू करावी, अशाही मागण्यात करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूर,अंबरनाथ परिसर नागरीकरणाबरोबर विविध रस्ते महामार्ग प्रकल्पांमुळे विकासाचे हब म्हणून विकसित होत आहे. पर्यायी रेल्वे मार्ग या भागाची गरज आहे. म्हणून आपण केंद्र सरकारकडे या कामांसाठी पाठपुरावा करत आहोत. राम पातकर माजी नगराध्यक्ष.