Ecofriendly Ganeshotsav, Thane ठाणे – पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी राज्य स्तरावरुन नागरिकांना आवाहन करण्यात येत होते.तसेच पालिका प्रशासनाकडून देखील विविध उपक्रम राबविले गेले. यामध्ये ठाणे महापालिकेच्या वतीने मूर्तीकारांना शाडू माती तसेच मूर्ती घडविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तर, पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी शाडू मातीची मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. तर, ठाण्यातील काही सामाजिक संस्थांनी तसेच शाळांमध्ये देखील शाडू मातीची मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. अशातच ठाण्यातील एका शाळेने एक अनोखा उपक्रम राबवित सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अनेकांच्या घरात तसेच सार्वजनित मंडळात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बुधवारी गणपतीचे आगमन झाले आहे. सर्वजण गणरायाची पूजा आणि आरती करण्यात तल्लीन झाले आहेत.गणपतीच्या पूजेसाठी फुलांच्या हाराचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे गणपती विसर्जनापर्यंत मोठ्याप्रमाणात निर्माल्य तयार होते. हे निर्माल्य अनेकजण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतात आणि ते गणपती विसर्जनाच्या दिवशी घाटावर घेऊन जातात. त्याठिकाणी सर्वांचे निर्माल्या एकत्रित केले जाते.

परंतून, बहुतांश जणांचे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत असल्यामुळे प्रदूषणास आमंत्रण देण्यासारखे असते. त्यामुळे हे निर्माल्य कागदी पिशव्यांमध्ये साठवून ठेवावे असे आवाहन नागरिकांना केले जाते. मात्र, अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. या प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणास हानी पोहोचते. पर्यावरणावर होणारा हा दुष्परिणाम रोखण्यासाठी ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या बेडेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचा वापर करुन कागदी पिशव्या बनविल्या आहेत. गणपतीचे निर्माल्यासाठी या कागदी पिशव्यांचा वापर करा आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळा असे आवाहन या विद्यार्थ्यांकडून केले जात आहे.

बेडेकर शाळेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रापासून ७०० ते ८०० पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्या गणेशोत्सवाच्या आधी शहरातील काही कारखान्यात नेऊन त्याचे वाटप केले. प्रत्येक गणेशभक्तांना या पिशव्या द्याव्या असे त्यांना सांगण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात गणपतीचे आगमन झालेल्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये या कागदी पिशव्या तयार करुन वाटप केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या पिशव्या शाळेतील शिक्षिका कल्पना बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या आहेत. अनेक वर्षापासून बोरवणकर यांच्या माध्यमातून सण-उस्तवाच्या काळात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत.