ठाणे : यंदा आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील विविध शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या एकादशीला जनजागृती करणाऱ्या संकल्पना ठेवत यंदाची एकादशी साजरी होणार आहे. विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या दिशेने नेण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये भक्तीभाव जागृत करण्यासाठी शाळांमध्ये दिंडी मिरवणूक, अभंग गायन, विठ्ठल-रुक्मिणीची पूजा, पारंपरिक खेळ यांसह स्वच्छतेचे महत्त्व, औषधी वनस्पती या संकल्पनेवर आधारित नाटक तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे.
ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या दिशेने नेण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये भक्तीभाव जागृत व्हावा या उद्देशाने शहरातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आषाढी एकादशी सुट्टीच्या दिवशी रविवारी असल्याने शाळांमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारी आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. यात विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शहरातील सिग्नल शाळा समर्थ भारत व्यासपीठ या शाळेत औषधी वनस्पती या संकल्पनेवर आधारित शनिवारी एकादशी साजरी केली जाणार आहे.
हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी कोरफड, कडीपत्ता, तुळस असे विविध प्रकारचे औषधी वनस्पती जमा केले आहेत. या वनस्पतींचे वैज्ञानिक फायदे, उपयोग, पारंपारिक उपचारपद्धती याची विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. शहरातील मेट्रोच्या कामांमुळे तसेच विविध ठिकाणच्या खोदकामांमुळे यंदा शाळेतच एकादशीचा कार्यक्रम साजरा होणार आहे. तसेच ए. के .जोशी इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्यावतीने शनिवारी दिंडीचे आयोजन केले आहे.
यात स्वच्छता या विषयावर विद्यार्थी नाटक सादर करणार आहेत. यामध्ये स्वत:ची तसेच आजूबाजूची आणि पर्यावरणाची स्वच्छता कशी राखावी याचे महत्व नाटकाद्वारे सांगितले जाणार आहे. नौपाडातील सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेत शुक्रवारी दिंडीचे आयोजन केले आहे. ही दिंडी शाळेभोवती तसेच ब्राम्हण सोसायटी, गोखले रोड या मार्गाने काढली जाणार आहे.
त्याचबरोबर शनिवारी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी किर्तनाचे आयोजन केले आहे. यावेळी मंजुषा ब्रह्मे या किर्तन सादर करणार आहेत. बाळकूम परिसरात असलेली विद्या प्रसारक संस्थेचे विद्यालय या शाळेत शनिवारी दिंडीचे आयोजन केले आहे. ही दिंडी बाळकुम परिसरातून काढली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी पारंपारिक वेशभूषाकरित सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थित पालकांना तुळशीचे रोप भेट म्हणून दिली जाणार आहेत.
मेत्ता फाउंडेशन या संस्थेच्यावतीने येऊर पाटोना पाडा येथील प्री प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वारीचे आयोजन केले आहे. ही वारी शाळेपासून वनीचा पाडा या दिशेने निघणार आहे. यात पालखी, झेंडे ,टाळ मृदुंगाचा नाद, तुळशी वृंदावन, विठ्ठल रखुमाई आणि वारकरी यांची वेशभूषा विद्यार्थी करणार आहेत. तसेच पाटोणा पाड्यातील समर्थांच्या मठामध्ये आणि शेवटच्या बस थांब्यावर रिंगण धरत विठू माऊलीचा गजर केला जाणार आहे.