ठाणे : भिवंडी येथे रिक्षातून शाळेत निघालेल्या विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. तिने स्वरक्षणासाठी कर्कटचा वापर करुन पळ काढला होता. अखेर या विद्यार्थीनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शांतीनगर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

भिवंडी येथे इयत्ता १० वीत शिकरणारी १६ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ती भिवंडी येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिची दररोज दुपारच्या सत्रात शाळा असते. त्यामुळे ९ जुलैला ती दुपारी १२ वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार तीने घराजवळून रिक्षातून प्रवास सुरु केला. त्यावेळी ती रिक्षामध्ये एकटीच प्रवास करत होती. रिक्षा काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवासी रिक्षामध्ये बसला.

शाळेजवळ रिक्षा पोहचल्यानंतर तिने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितली. परंतु त्या चालकाने रिक्षा थांबविली नाही. त्यानंतर रिक्षामधील प्रवाशाने तिला गप्प बसण्यास सांगितले. रिक्षा चालक चाविंद्र येथे रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी समय सूचकता दाखवित विद्यार्थीनीने दप्तरातील कर्कटक बाहेर काढून रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानंतर शेजारी बसलेल्या प्रवाशास धक्का मारून रिक्षातून उडी मारत पळ काढला. ती शाळेत पोहचली. शाळेतून घरी आल्यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या आई आणि वडिलांना सांगितली. ११ जुलैला या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी संबंधित रिक्षा चालक आणि त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला होता. घटनेबाबतची माहिती भिवंडीत पसरल्यानंतर पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित रिक्षा चालक आणि त्याच्या साथिदारावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम १३७ (२) आणि ६२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पथके तयार केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थीनीला परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्यात आले. परंतु रिक्षा चालकाची ओळख पटत नव्हती. अखेर सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्वेषणाच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव अजगर शेख असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. तो मुळचा उत्तर प्रदेश येथील असून विद्यार्थीनीने त्याची ओळख पटविल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत.