शहापूर : शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या हत्या प्रकरणात पोलीसांनी तिसर्‍या आरोपीला अटक केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या खळबळजनक घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली.

शहापुरातील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स च्या दुकानातील कामगार दिनेश चौधरी हा २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि त्याच्या जवळील बॅग घेऊन ते फरार झाले होते. पोलीसांच्या तब्बल बारा पथकांच्या माध्यमातून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू होता.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीठाच्या गिरणीत आलेल्या शशांक उर्फ सोनू मिश्रा याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती. तर हल्ल्यातील फरार असलेल्या तौसिफ आलम सिद्दीकी याला भिवंडीतील नुरीनगर येथून अटक केले होते. त्यानंतर दहा महिन्यांनी या गुन्ह्यातील तिसरा आरोपी फैजान सिद्धीकी याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली असून अन्य फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले.