Thane news: ठाणे : ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावर शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार राजन विचारेंवर टीका केली. यानिमित्ताने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी उघड केलेला “नंदलाल समिती अहवाल” पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे खासदार नरेश म्हस्के यांनी या आंदोलनावर थेट निशाणा साधला. ज्यांना आनंद दिघे यांनी अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं, तेच आज भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढतात, हे जगातील आठवं आश्चर्य आहे!” दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं, तेव्हा त्यांच्याच शिष्य म्हणवणारे लोक आज उलट नाट्य करतात, असे म्हस्के म्हणाले.

दिघे साहेबांची आठवण आणि आरोपांचा इतिहास

धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या काळात ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करत ४१ टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप केला होता.

त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती. समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख होते. त्यात राजन विचारे यांचे नाव होते. त्यानेच २००७ साली ठाणे महापालिकेत हा अहवालावर दप्तरी दाखल केला, असा आरोप म्हस्के यांनी केला.

दिघे साहेब खोटं बोलले का?”

दिघे यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ठोस आरोप केले, तेच आज “भ्रष्टाचारविरोधी” मोर्चाचे नेते बनले आहेत.

जर आनंद दिघे यांनी केलेले आरोप खोटं असतील, तर विचारे यांच्यासोबत असलेल्या केदार दिघे यांनी याचे उत्तर द्यावे. आनंद दिघे हे खोटे होते का, हे त्यांनी स्पष्ट करावे. ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले, तेच आज सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवतात, हे चुकीचे आहे. भ्रष्टाचारविरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण गरजेचे आहे, असे म्हस्के म्हणाले.