ठाणे : ठाण्यातील ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी आपला वैज्ञानिक प्रकल्प घेऊन युरोपातील आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गेले होते. परदेशातील हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला असून त्यांनी सांगितले, “हा प्रकल्प आमचा आत्मविश्वास दृढ करण्यास नक्कीच प्रभावशाली ठरला.” तसेच इंरनॅशनल स्नॅक शेरिंग या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक भारतीय पदार्थांची मेजवानी उपस्थितांना दिली. यावेळी लक्झमबर्गचे पंतप्रधान लूक फ्रीडन यांनी देखील त्या स्टॉला भेट दिली आणि कौतुक केल्याचे सांगितले.

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या विद्या प्रसारक मंडळ संचलित ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन भारतीय संस्कृतीची देवाणघेवाण केली आहेत. या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट वे टू चेक कार्बन इमिशन कॉज बाय व्हेहिकल्स’ या प्रकल्पाची निवड लक्झेम्बर्ग या युरोपियन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली होती. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अभिनव प्रकल्प विद्यार्थ्यांनी डॉ. सुधाकर आगरकर आणि विज्ञान शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली साकारला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेतील आर्यन म्हात्रे, अनिश बर्वे आणि सोहम बेडेकर हे तीन विद्यार्थी २७ ऑक्टोबर रोजी लक्झेम्बर्गकडे रवाना झाले होते.

विद्यार्थ्यांसोबत विज्ञान विषयाच्या शिक्षिका गौरी मोहिले याही गेल्या होत्या. २८ ऑक्टोबर रोजी आयोजकांनी पिझ्झा आणि बॉलिंग इव्हेंट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. २९ ऑक्टोबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचे औपचारिक उद्धाटन पार पडले. याच दिवशी इंरनॅशनल स्नॅक शेरिंग या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पारंपरिक भारतीय पदार्थ चकली,लाडू, तिखट शेव आणि शंकरपाळीची मेजवानी उपस्थितांना दिली. यावेळी लक्सेंबर्गचे पंतप्रधान लूक फ्रीडन यांनी देखील त्या स्टॉला भेट दिली आणि कौतुक केले. त्यानंतर सांस्कृतिक समारंभात विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाचे भजन सादर केले. ३१ ऑक्टोबर रोजी या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाची सांगता करण्यात आली.

या प्रदर्शनात ह्या विद्यार्थ्यांनी विविध देशातील प्रदर्शनीला भेट देऊन त्यांचा प्रकल्प जाणून घेऊन स्वतःच्या माहितीत भर करून घेतली.शाळेच्या प्रकल्पाला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आपला प्रकल्प समजवून देत असताना त्यांच्या शंकेचे निरसन विद्यार्थी करत होते. लक्सेंबर्गच्या पंतप्रधानांसोबतची भेट तर त्यांना छान अनुभूती देऊन गेली. हा प्रकल्प आमचा आत्मविश्वास दृढ करण्यास नक्कीच प्रभावशाली बनला असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

मुख्याध्यापिका डॉ. अस्मिता मोहिले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की, “आमच्या या भावी शास्त्रज्ञांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्यांचे परिश्रम, निष्ठा आणि उत्कृष्टता ही शाळेसाठी गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यानी प्रकल्पा बद्दल घेतलेली मेहनत चिकाटी, कष्ट, प्रकल्पा संदर्भात केलेला अभ्यास, हे शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात दुमत नाही.