ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय कचरा हस्तांतरण केंद्र उभारणीस सातत्याने विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर दररोज निर्माण कचऱ्याचे आवारातच वर्गीकरण आणि व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच प्रशासनाने कचऱ्यापासून खत निर्मीतीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे कामकाज नेमके कसे चालते, हे पाहण्याची संधी गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनमार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे.

मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमांतर्गत प्रत्येकी ४०० लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एअरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिली आहे. निर्माण कचऱ्याचे आवारातच वर्गीकरण आणि व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा समस्येचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. प्रभाग समितीनिहाय कचरा हस्तांतरण केंद्र उभारणीचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबाजवणी सुरू होताच त्यास विरोध झाला होता. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येईल, या भितीपोटी त्यास विरोध झाला होता. यानंतर पालिकेने घनकचरा अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार प्रत्येक मोठ्या कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे. मात्र, त्यासही विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर दररोज निर्माण कचऱ्याचे आवारातच वर्गीकरण आणि व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देण्यासाठी पालिका प्रशासनाने मुख्यालय इमारतीच्या आवारातच खत निर्मीती प्रकल्प उभारला आहे.

एसओआरटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, एक संस्था आणि २० मोठ्या कचरा उत्पादक गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एअरोबिन दिले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार प्रत्येक मोठ्या कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या अनुषंगाने ज्या गृह संकुलांत अशाप्रकारे खत निर्मिती करण्याची इच्छा आहे, अशा गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळी भेट द्यावी. या प्रकल्पाला भेट देण्याची वेळ ठरवण्यासाठी https://forms.gle/DJ2zuhxx83S3aBsD9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.