एकेकाळी ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ पुरस्कार मिळालेले ठाणे शहर हे आता ‘अस्वच्छ, बकाल ठाणे’ बनले आहे. अशा प्रकारचे वास्तव असूनही शहर ‘स्मार्ट सिटी’ बनण्याचे स्वप्न पाहात आहे. स्मार्ट हे विशेषण व्यक्ती, शहर यासाठी छान वाटत असले तरी नेमके स्मार्ट म्हणजे नक्की काय? गुप्तांगाची खरूज वा त्वचारोग झाकून ठेवून चेहऱ्यावर सुंदर मेकअप करणाऱ्या, झकपक कपडे घालणाऱ्या व्यक्तीला स्मार्ट म्हणायचे का? ठाणे शहराचे काहीसे तसेच झाले आहे.

तलावांचे सुशोभीकरण, कलादालन, आयुर्वेदिक वृक्षोद्यान असे काही मोजके देखावे मिरविणाऱ्या ठाणे शहरातील नाले, नाल्यांच्या काठावरील वस्त्या, फूटपाथ तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे, दर शंभर पावलांवरील छोटी प्रार्थनास्थळे, ठिकठिकाणी साचून राहिलेले कचरा आणि उकिरडय़ाचे ढीग यामुळे पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांची सुरुवात महापालिका मुख्यालयासमोरून होते. अनेक भाजीवाले, फेरीवाले तिथे ठाण मांडून असतात. अगदी महापालिका भवनातील पहिल्या मजल्यावरील दालनातूनही हे दिसते. या पाचपाखाडी परिसरातच गणपती, नवरात्रोत्सव, दहीहंडी या काळात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मंडप, कर्कश आवाजातील ध्वनिक्षेपक, रस्त्यांवर उभी केलेली वाहने, प्रचंड गर्दी यामुळे नितीन चौक ते खंडू रांगणेकर चौक हा रस्ता व परिसर सर्वाधिक प्रदूषित आहे. महापालिका मुख्यालयासमोर ही स्थिती तर इतर छोटे-मोठे रस्ते-गल्ल्यांची अवस्था तर बघायलाय नको. केवळ याच परिसराचा विचार करायचा तर माननीय आयुक्त व संबंधित पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती.

१. आपण एकदा सिद्धेश्वर तलाव बसस्टॉप (हाय वे) ते सिद्धेश्वर तलाव- शहीद उद्यान आणि विशेषत: नूरी बाबा दर्गा रोड या मार्गावरील फूटपाथवरून पायी चालून दाखवावेच. दोन्ही बाजूला दुहेरी अनधिकृत पार्किंग, फूटपाथवरील अतिक्रमणे, भर रस्त्यावरील प्रार्थनास्थळे यामुळे पायी चालणाऱ्यांचे खूप हाल होतात. मखमली तलाव ते वंदना बस स्टॉप या मार्गाच्या फूटपाथवरून पायी चालावे. केवळ गाडीतून पाहणी करून नागरिकांचे होणारे हाल समजणार नाहीत. चाललात तर व्यायाम होईल आणि नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागतेय, हेही समजेल. या विभागातील दोन नगरसेवक नेमके काय करतात, हा प्रश्नच आहे.

२. कौशल्य हॉस्पिटल, तुळजा भवानी मंदिर, होंडा गाडी केंद्र ते महापालिका या रस्त्यांवर गणेशवाडीत रात्रीच्या वेळी व दिवसाही होणारे आवाज ऐकावेत. विविध सण, उत्सव, वैयक्तिक लग्नसमारंभ, पूजा यांसाठी रस्त्यांवर असणारे मांडव, ध्वनिवर्धक, फटाके यांमुळे हा विभाग ‘गोंगाट झोन’ बनला आहे. विशेषत: हॉस्पिटलच्या परिसरात हे कसे चालते याचे आश्चर्य वाटते. आवाज या क्रमाने असतात. विविध प्रसंगानिमित्ताने रात्री ११ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकावर गाणी अथवा भजने, लग्न अथवा अन्य मिरवणुकांनिमित्त मोठय़ा आवाजाचे फटाके. अनेकदा तर हायवेच्या दिशेने रात्री बारा ते दोन या दरम्यान कधीही एकेक तासाच्या अंतराने बॉम्ब फुटल्यागत फटाके फुटतात. त्या आवाजाने झाडावरील कावळ्यांची झोपमोड होऊन त्यांची कर्कश काव काव भर रात्री सुरू होते. रस्त्यावरील डझनभर भटकी कुत्री भुंकू लागतात. आठवडय़ातील किमान चारदा अशा पद्धतीने रात्री झोपमोड होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. कौशल्य हॉस्पिटल, गणेशवाडी परिसर व पुढे वाहणाऱ्या नाल्याच्या काठावरील कोणत्याही सोसायटीत विशेषत: मिताली, सुचेता, महादेव, मोना, शिवशक्ती, शिवदर्शन या परिसरात अहोरात्र नाल्याची दरुगधी पसरलेली असते. सकाळी व रात्री विशिष्ट वेळी ही दरुगधी असह्य़ होते. परिसरातील अनधिकृत वस्त्यांचे ड्रेनेज थेट नाल्यात सोडण्यात आले असून ही दरुगधी त्याचाच परिणाम आहे. माननीय आयुक्तांनी एकदा हे सर्व प्रत्यक्ष पाहावे. त्यामुळे हे किती भीषण आहे, याची कल्पना येईल. गणेशवाडीतील लोक दररोज कचऱ्याच्या पिशव्या नाल्यात टाकून देत असतात. वर्षांतून केवळ एकदा नालेसफाईचे नाटक करून काय साधणार?  केवळ पोकळ घोषणा किंवा वरवरच्या मलमपट्टय़ा करून भागणार नाही. मूळ दुखणे अतिशय गंभीर आहे