ठाणे : वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध स्थानिक मुद्द्यांवरून सोमवारी शिवसेना (उबाठा), मनसे, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त मोर्चा काढला. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता.

सायंकाळच्या वेळेत निघालेल्या या मोर्चामुळे ठाण्याच्या मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला, कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. तसेच गडकरी रंगायतन येथे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

राम गणेश गडकरी रंगायतन येथून हा मोर्चा निघाला. दुपारी ३ वाजता मोर्च्याला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले होते. मात्र मोर्चा प्रत्यक्षात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुरू झाला. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय हा मार्ग ठप्प झाला होता. गडकरी रंगायतन येथील मार्ग हे ठाणे स्थानक परिसरातील रस्त्यांना जोडण्यात आले आहेत. यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. महापालिका मुख्यालयासमोर स्टेज उभारण्यात आले होते आणि त्यामुळे येथील एक मार्गिका बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

पहिल्यांदाच एकत्र ठाकरे बंधूंचे समर्थक

या मोर्च्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आल्याचे दृश्य पहिल्यांदाच ठाणेकरांनी पाहिले. दोन्ही पक्षांचे झेंडे कार्यकर्ते फडकत होते आणि “ठाकरे बंधू आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. तसेच शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हेही मोर्चा सहभागी झाले होते. त्यानंतर या सर्वांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

महापालिका निवडणुकीची तयारी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. याच बालेकिल्ल्यात शिवसेना (उबाठा), मनसे, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोर्चाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नाटकप्रेमींचे हाल

सोमवारी गडकरी रंगायतन येथे ‘कुटुंब कीर्तन’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मोर्चेकरांची गर्दी आणि बंद रस्त्यांमुळे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना त्रास झाला. काहींनी गर्दीतून मार्ग काढत नाट्यगृहात प्रवेश केला आणि दबक्या आवाजात मोर्च्याबाबत नाराजी व्यक्त केली.

या मोर्चामुळे तलावपाली, गडकरी रंगायतन, टेंभीनाका, डाॅ. मूस मार्ग, हरिनिवास, पाचपाखाडी या भागात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्या नागरिकांचे कोंडीमुळे हाल झाले. येत्या काही दिवसांत दिवाळी सण साजरा होणार आहे. त्यामुळे नागरिक ठाणे बाजारपेठेत, नौपाडा, राम मारूती रोड भागात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. खरेदीसाठी आलेले नागरिक आणि मोर्चा मोर्चामुळे कोंडीत भर पडली. वाहन चालक आणि प्रवाशांना मोर्चामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. त्यामुळे पर्यायी मार्गांवरही कोंडी झाली होती.